Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

नव्या मटेरियल्सवर काम झाल्यास नजीकच्या भविष्यात भारत ‘ऑटोमोटिव्ह एक्सलन्स हब’ आणि ‘ऑटोमोटिव्ह चॅम्पियन’ म्हणून पुढे येईल

पुणे  : आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेच्या दिशेने वाटचाल करीत असताना अॅल्युमिनियम अलॉय आणि प्लॅस्टिक सारख्या नेहमी वापरात असलेल्या मटेरिअल्स पेक्षा आता मॅग्नेशियम, टायटॅनियम ही वजनाने हलकी, कठीण आणि कमी वाया जाणारी मटेरिअल्स इलेक्ट्रिल परिवहन क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरतील आणि म्हणूनच या नव्या मटेरियल्सवर काम झाल्यास नजीकच्या भविष्यात भारत ‘ऑटोमोटिव्ह एक्सलन्स हब’ आणि ‘ऑटोमोटिव्ह चॅम्पियन’ म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचे सहसचिव हनीफ कुरेशी यांनी केले.

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)च्या वतीने आणि एसएई इंडिया व एएसएम इंटरनॅशनल, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून (बुधवार दि. ३१ मे) चाकण येथील होमोलोगेशन टेक्नॉलॉजी सेंटर (एआरएआय-एचटीसी) येथे ‘ऑटोमोटिव्ह मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग’ (एएम अँड एम २०२३) या विषयावर आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

सॅनी हेव्ही इंडस्ट्रीज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक गर्ग, टाटा मोटर्स लि. चे मुख्य तांत्रिक अधिकारी व एआरएआयचे अध्यक्ष राजेंद्र पेटकर, एआरएआयचे संचालक डॉ रेजी मथाई आणि एआरएआयच्या वरिष्ठ उपसंचालिका व परिषदेच्या समन्वयक मेधा जांभळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हनीफ कुरेशी आणि राजेंद्र पेटकर हे ऑनलाईन माध्यमातून परिषदेत उपस्थित होते. ‘शेपिंग प्रोग्रेसिव्ह मोबिलिटी थ्रू इमर्जिंग मटेरिअल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी’ ही या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेची संकल्पना असून ‘मटेरियल मॉडेल डेटाबेस इनिशिएटिव्ह फॉर डेटा सिम्युलेशन’ या प्रकल्पाचे अनावरण देखील या वेळी करण्यात आले.

हनीफ कुरेशी पुढे म्हणाले, “उदयोन्मुख भारताच्या दृष्टीने वाहनउद्योग क्षेत्र हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विचार केल्यास हे क्षेत्र १२० दशलक्ष डॉलर्सहून जास्त किंमतीचे आहे, तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा विचार केल्यास याचा वाटा तब्बल ७% इतका आहे. उत्पादन क्षेत्रात याद्वारे ३५% इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते, हे लक्षात घ्यायला हवे. आज जगभरात उत्सर्जन मापदंड हे आणखी कडक करण्याबरोबरच इंधन कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.  भारतीय वाहनउद्योग क्षेत्राच्या प्रगतीची देखील हीच वेळ असून ही प्रगती करीत असताना आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी आधुनिक व नवी मटेरिअल्स आणि त्यांसाठीच्या प्रक्रिया यांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल.”

लोकसंख्या, मागणी आणि लोकशाही हे तीन ‘डी’ देशासाठी महत्त्वाचे असून यामुळेच आज भारत वाहनउद्योग क्षेत्रात जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर, ट्रॅक्टर उत्पादक देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर, हेव्ही ट्रक उत्पादक देशांच्या यादीत तिसऱ्या क्रंमाकावर आहे असे सांगत दीपक गर्ग म्हणाले, “आज कॉम्पोझिट मटेरिअल्सची मागणी वाढत आहे. त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी होऊ शकतो. ही सगळी मटेरियल्स नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन उद्योगात वजन कमी करण्याबरोबरच कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करून ‘गेम चेंजर’ ठरतील. अ‍ॅल्यूमिनयन अ‍ॅलॉय, कार्बन फायबर, प्लॅस्टिक पॉलिमर, मॅग्नेशियमसारखे हलके वजनाचे मटेरियल इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात क्रांती घडवतील.’’

ऑटोमोटिव्ह मटेरियल्स उत्पादनाबाबत ‘लोकल टू ग्लोबल’चा मार्ग अवलंबिला पाहिजे. ऑटोमोटिव्ह मिशन प्लॅन २०२६, पीएलआय स्कीम यांसारख्या सरकारच्या योजनांमुळे देशांतर्गत उत्पादन वाढले आहे. आज भारतातील इलेक्ट्रिक चार चाकीचे वजन हे जीवाश्म इंधन चार चाकी वाहनाच्या वजनापेक्षा जास्त आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ३० टक्क्यांनी वाढवायचा असल्यास इलेक्ट्रिक वाहनाचे वजन कमी करण्याबरोबरच या वाहनांची पर्यावरणीय अनुकुलता वाढविण्यावर भर द्यायला हवा, असेही गर्ग यांनी नमूद केले. केंद्र सरकारने राबविलेल्या धोरणांनुसार आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येणार असून सन २०३० पर्यंत एकूण वाहननिर्मितीच्या ३०% ही इलेक्ट्रिक वाहने असतील. इलेक्ट्रिक वाहन उद्योग २०२१ ते २०३० या काळात सुमारे ४९% नी वाढण्याची अपेक्षा आहे. या द्वारे १७ दशलक्ष वाहने ही २०३० पर्यंत उत्पादित होणार असून यांद्वारे ५० दशलक्ष नागरिकांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत, याकडेही गर्ग यांनी लक्ष वेधले.

यावेळी बोलताना राजेंद्र पेटकर म्हणाले, “मटेरियल्सचा रोल आणि मॅन्युफॅक्चरिंग टेक्नोलॉजी हे अर्थव्यवस्थेच्या प्रत्यक क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत. वाहन उद्योग क्षेत्र देखील याला अपवाद नाही. सध्या जागतिक पातळीवर परिवहन क्षेत्रात होत असलेल्या घडामोडी पाहता मटेरियल्स हे महत्त्वपूर्ण आहेत. यशस्वी सर्क्युलर अर्थव्यवस्थेमध्ये डिझाईनिंग पासून उत्पादनापर्यंत मटेरियल्सचा काळजीपूर्वक वापर होणे गरजेचे असताना वाहनउद्योग क्षेत्रासाठी देखील हे तितकेच महत्त्वाचे आहे. भारतातील मटेरियल्स उद्योगाने नव्या आणि पर्यायी मटेरियल्सवर मोठ्या प्रमाणात काम केले आहे.”

सध्या वाहन उद्योग क्षेत्र हे इंधनाच्या कार्यक्षमतेतील सुधारणा, वजनाने हलकी वाहनांची संरचना, आवश्यक सुरक्षितता, पर्यावरणावरील परिणाम, उत्पादन विकास चक्रात होणारी घट, ई-मोबिलिटीसारखे मोबिलिटी सोल्यूशन यांसाठी प्रयत्नशील आहे. आज काळाची गरज असलेल्या आत्मनिर्भरतेच्या अर्थात स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकत असताना मटेरिअल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हे दोन्ही घटक वाहन व्यवसायासातही महत्त्वाचे आहेत. हेच लक्षात घेत एआरएआयच्या माध्यमातून आम्ही मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी या विशेष आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. याद्वारे या क्षेत्रातील प्रमुख आणि तंत्रज्ञ एकत्र येत एकाच व्यासपिठावर नाविन्यपूर्ण संकल्पना, तंत्रज्ञान, उपाय, आव्हाने यांवर चर्चा करतील अशी माहिती डॉ रेजी मथाई यांनी दिली.

याशिवाय परिषदेत अॅडव्हान्स मटेरियल, प्लॅस्टिक व कंपोझिट, उत्पादन प्रक्रिया, अॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ई-मोबिलिटी, डिझाईन व सिम्युलेशन, एआय व एमएल यांसारख्या विविध विषयांची अलीकडील काळात झालेली प्रगती, इंडस्ट्री ४.०, सरफेस कोटिंग आणि प्रोसेसिंग, मटेरियल मॉडेलिंग अशा विविध विषयांवर परिषदेत चर्चा होणार असून ‘मटेरियल्स फॉर सस्टेनेबल मोबिलिटी’,  वाहन उद्योग क्षेत्रातील भविष्यवेधी तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग डेटा अॅनालिटिक्स इन मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयावर होणारे चर्चासत्र हे या परिषदेचे मुख्य आकर्षण असेल. यामध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञ, सीटीओज्, संशोधक आणि वैज्ञानिक आपले विचार मांडतील.

या आंतरराष्ट्रीय परिषद मध्ये वाहनउद्योग क्षेत्र, संशोधन व विकास संस्था (आर अँड डी), शैक्षणिक क्षेत्र यांमधील २० हून अधिक तज्ज्ञांची बीजभाषणे, चर्चासत्रे यांचा समावेश असणार आहे. याबरोबरच मटेरियल्स आणि मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित १४ तांत्रिक सत्रांत ४४ हून अधिक तांत्रिक पेपर्स देखील सादर केले जातील. एआरएआय चाकण येथे परिषदेच्या ठिकाणी एक प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले असून या ठिकाणी वाहन उद्योग क्षेत्र, तंत्रज्ञान आणि विकास यांच्याशी संबंधित २५ स्टॉल्स आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेजी मथाई यांनी केले तर मेधा जांभळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading