मुस्लिम समाजाने सत्यशोधक बनणे गरजेचे : डॉ. रावसाहेब कसबे
पुणे : कुणी काहीही म्हटले तरी देशात समान नागरी कायदा आणायलाच हवा. हे आज ना उद्या करावेच लागेल कारण ते राज्यघटनेनेच आपल्याला बंधनकारक आहे. मुस्लिमांनाही त्याला सामोरे जावेच लागेल. मुस्लिम समाजाला माणूस म्हणून उन्नत होण्यासाठी धर्माच्या बेड्या तोडून सत्यशोधक बनावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी डॉ. अंजली सोमण पुरस्कृत मसाप जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांना आणि डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांना डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट शाखा फिरता करंडक मसापच्या आटपाडी शाखेला, बाबुराव लाखे स्मृती वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार दामाजीनगर शाखा, रत्नाकर कुलकर्णी मसाप कार्यकर्ता पुरस्कार डॉ. शशिकला पवार, कल्याण शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
डॉ. कसबे पुढे म्हणाले, मुस्लिम समाजात सुधारणा कशी होईल हा आज संपूर्ण भारतापुढील प्रश्न आहे. आजचे हिंदुत्वाचे राजकारण हे प्रतिक्रिया स्वरूपात आहे. मुस्लिम समाज अजूनही अंधश्रद्ध, धर्माला कवटाळून बसलेला आणि मध्ययुगातच वावरतो आहे. यातून बाहेर काढायचे काम सर्व पुरोगामी, धर्म निरपेक्ष शक्तींचे काम आहे. भारतातील मुस्लिम सत्यशोधक बनत नाहीत तोवर ते जगण्याला लायक बनूच शकत नाही. त्यासाठी त्यांना धर्माच्या बेड्या तोडाव्या लागतील, ही केवळ मुस्लिम समाजाची नव्हे संपूर्ण भारताची गरज आहे.
अच्युत गोडबोले म्हणाले, “सर्व ज्ञान शाखा मला सातत्याने खुणावत राहिल्या तीच माझ्या लेखनामागची प्रेरणा राहिली आहे. विद्यार्थी बनून मी शिकत राहतो. प्रचंड वाचतो आणि मग सोप्या भाषेत लिहायचा प्रयत्न करतो. मराठी ज्ञानभाषा व्हावी त्यासाठी मी सातत्याने लेखन करतो आहे.
डॉ. विवेक सावंत म्हणाले, “साहित्य परिषदेने साहित्य विश्वात एक नवे चैतन्य आणले आहे. साहित्य परिषदेचे रूपांतर आता एका चळवळीत झालेले आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे.”
डॉ. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. मी मुस्लिम म्हणून जन्मलो असलो तरी माणूस म्हणूनच मरणार आहे. मुस्लिम समाजात जागृती निर्माण करण्याचे काम पुढे नेत रहाणार आहे. समान नागरिक कायदा लागू करायला हवा पण त्यापूर्वी व्यापक चर्चा व्हायला हवी.
प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.
हमीद दलवाई यांच्या नावाने पुरस्कार देणार
साहित्यिक हमीद दलवाई यांनी उत्तम साहित्य निर्मिती करूनही त्यांच्याविषयीं दुरावा बाळगला जातो आणि त्यांना उपेक्षित ठेवले आहे असे मत डॉ. तांबोळी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, पुरोगामी लोकांनी दुरावा बाळगलेला आहे. मुस्लिम समाजातही त्यांना अद्याप स्वीकारले जात नाही आणि त्यांचा आजही साहित्यिक म्हणून उल्लेख केला जात नाही, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पुढाकाराने त्यांच्या नावाने मसापने पुरस्कार सुरु करावा अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या आवाहनाला मसाप कार्यकारणीनेही सकारात्मक प्रतिसाद देत पुढील वर्षांपासून पुरस्कार सुरु करण्याची घोषणा केली.
