Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

सामाजिक संस्थांची चळवळ उभी राहणे गरजेचे – शेखर मुंदडा

पुणे : समाजामध्ये अनेक समस्या रोज भेडसावत आहेत. या समस्या सोडविणे एका व्यक्तीला शक्य नाही. त्यासाठी सामाजिक संस्था काम करत आहेत. सामाजिक संस्थांच्या कामांना व्यापक स्वरूप येण्यासाठी या संस्थांनी एकत्र आले पाहिजे. सामाजिक संस्थांनी विचारांचे आदान प्रदान करून समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आज सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन त्यांची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असे मत महा एनजीओ फेडरेशन चे संस्थापक शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले.

महा एनजीओ फेडरेशन आणि इंटरनॅशनल कोचिंग फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मॉडेल कॉलनीतील माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या सभागृहात करण्यात आले. पुण्यासह सातारा, सांगता, सोलापूर, धुळे, परभणी अशा विविध भागांमधून या शिबिरामध्ये ५० हुन अधिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. इंटरनॅशनल कोचिंग फेडरेशनचे डॉ. महेश देशमुख, जयश्री कीर्तने, महा एनजीओ चे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले, राहुल जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

शेखर मुंदडा म्हणाले, कोणतीही सामाजिक संस्था चांगल्या उद्देशाशिवाय खूप काळ चालू शकत नाही. केवळ पैशासाठी सामाजिक संस्था चालविणे चुकीचे आहे. त्यामुळे उद्देश बाजूला राहतो, तसेच संपूर्णपणे इतरांवर अवलंबून सामाजिक संस्था चालविणे कठीण आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी स्वतः सक्षम झाले पाहिजे. सामाजिक संस्थांनी यासाठी आपला उद्देश ठरविला पाहिजे.

डॉ. महेश देशमुख म्हणाले, कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रशिक्षणाची निश्चितच गरज असते. सामाजिक संस्थांनी व्यावसायिक दृष्ट्या प्रशिक्षण घेतल्यास त्यांना तळागाळातील व्यक्तींचे प्रश्न समजावून घेणे आणि त्यासाठी कशाप्रकारे आपण प्रयत्न करू शकतो, याची माहिती होऊ शकेल. प्रशिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य व्यक्ती यामधील संवाद अधिक योग्य प्रकारे वाढू शकेल.

अक्षय महाराज भोसले म्हणाले, महा एनजीओच्या माध्यमातून राज्यांमध्ये अडीच हजारांपेक्षा अधिक सामाजिक संस्था काम करत आहेत. या संस्थांमध्ये समन्वय साधून समाजामध्ये प्रश्न सोडविण्याबरोबरच विकासाची कामे करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. महा एनजीओ कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक शुल्क घेऊन  काम करत नाही तर समाजातील प्रश्नांना आम्ही अधिक प्राधान्य देत सेवा म्हणून विनामूल्य कार्य करते , असेही त्यांनी सांगितले. जयश्री कीर्तने यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading