fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsLIFESTYLE

जहांगीरमध्ये चित्रकार शरद काळे यांचे ‘कलरफुल डिव्होशन’ हे चित्र प्रदर्शन

सुप्रसिद्ध चित्रकार शरद काळे यांचे ‘कलरफुल डिव्होशन’ हे चित्र प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुबई येथे दि २३ ते २९ मे २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शरद काळे यांनी रहेजा स्कूल ऑफ आर्ट येथून आपले जीडी आर्टचे शिक्षण पूर्ण केले आहे. शरद काळे यांनी अनेक सामूहिक प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. जहांगीर आर्ट गॅलरी, मोक्ष आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर कला दालन यासारख्या प्रतिष्ठित कला दालनांमध्ये त्यांची चित्र प्रदर्शने झाली आहेत. त्याचबरोबर काळे यांनी लीला हॉटेल, मोक्ष आर्ट गॅलरी येथे एकल प्रदर्शनंही केली आहेत. शरद काळे हे अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. त्यामध्ये १९९५ मध्ये मुद्रा कलानिकेतनचा उत्कृष्ट पोर्ट्रेट पुरस्कार, सर्वोत्तम शैक्षणिक कार्यासाठी कॅमलिन लिमिटेडचा पुरस्कार, रहेजा स्कूल ऑफ आर्टमधील सर्वोत्कृष्ट रचना पुरस्कार यांचा समावेश आहे.

रोमँटिसिझमने एक काळ प्रचंड गाजवला. आजही अनेक कलाकारांवर रोमँटिसिझमचा प्रभाव आहे. शरद काळे यांची चित्रं ही रोमॅंटिसिझमला महत्व देतात. रोमँटिसिझम रसिकांना भावतो. रसिक या तत्वातील कलाकृतींना पटकन आपलंस करतात. त्यामुळेच शरद काळे यांची चित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा शांतता, मांगल्य आणि दैवत्वाची अनुभूती येते. ‘ ग्रामीण भागातील प्रेमात अखंड बुडालेली जोडपी’ हा शरद काळे यांच्या चित्रांचा मुख्य विषय आहे.

शरद काळे यांच्या चित्रातील मानवी चेहऱ्यावरील मुग्ध भाव बघून आपण समजतो की हे प्रेमाचं कॅनव्हासवरील सुंदर असं प्रगटीकरण आहे. शहरी गुंतागुंतीपासून दूर असलेले हे जीव प्रेमाची मुक्त उधळण करतात आणि रसिकांच्या मनाला सुखद अनुभव देतात. राधाकृष्ण असो की एखाद्या सामान्य जोडप्याचं चित्र, ‘प्रेम’ हे एकच तत्व शरद काळे यांच्या कॅनव्हासला सजवतं. शरद काळे यांच्या चित्रातील बासरी रसिकांना कृष्ण काळात घेऊन जाते आणि रसिक दैवत्व आणि अध्यात्माचा शांत अनुभव घेतात. शरद काळे यांच्या चित्रातील प्रत्येक आकार हा रसिकांना सौन्दर्याचा पुरेपूर अनुभव देतो. रसिक आनंदात न्हाऊन तृप्त होतात. काळेंच्या चित्रातील तेजस्वी आणि मोहक रंग या आनंदाला द्विगुणित करतात.

शांतता, अध्यात्म आणि सौन्दर्याचा अनुभव घेण्यासाठी हे प्रदर्शन आवर्जून बघावे असेच आहे. हे प्रदर्शन सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत रसिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असेल.

Leave a Reply

%d