Karnataka – मुख्यमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला आहे. काँग्रेसने सिद्धरमय्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं आहे. तसंच डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री केलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहणार आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. निवडणुकीतील विजयानंतर दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरु होता. या बैठकांना अखेर यश आलं असून सिद्धरमय्या यांच्याकडे सत्तेच्या चाव्या सोपवण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुरजेवाला यांना यावेळी पाच वर्षांचा कालावधी दोघांमध्ये विभागला जाणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “सत्ता फक्त कर्नाटकच्या जनतेसोबत वाटली जाईल, याशिवाय दुसरं काही नाही”. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मध्यस्थी केल्यानेच डी के शिवकुमार दुसऱ्या क्रमांकाची जागा स्विकारण्यास तयार झाले आहेत. पक्षाच्या हितासाठी आपण त्याग करत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.
