fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन होणार “हर घर सावरकर” अभियानाची सुरुवात

पुणे : हर घर सावरकर समिती तर्फे “हर घर सावरकर” अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे व याची सुरुवात दि. २१ मे २०२३ रोजी किल्ले रायगड येथे आयोजित कार्यक्रमापासून होणार आहे. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देताना समिती सदस्यांनी सांगितले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती लिहिली आहे त्यामुळे या अभियानाची सुरुवात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन करण्याचे ठरविले आहे.

दि. २१ मे रोजी रायगडावर उद्योग मंत्री  उदय सामंत आणि आमदार भरत  गोगावले यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. सर्वप्रथम पहाटे १०० गिर्यारोहक पायथ्यापासून रायगडावर जाणार आहेत व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन आणि आरती, दीपप्रज्वलन व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. कलासक्त संस्थेचे कलाकार “छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती” तसेच “जयोस्तुते” या गाण्यावर भरतनाट्यम नृत्य सादर करतील. श्रीमंत बाजीराव पेशवे सैनिकी शाळा, मोहोळ येथील विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांना परेडद्वारे मानवंदना देतील व गिर्यारोहक 75 क्रांतिकारकांच्या प्रतिमा घेऊन कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. सिद्धार्थ शाळू त्यांचा सावरकर यांच्या कार्यावर लिहिलेल्या आपल्या लेखाचे वाचन करतील. उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत आणि मा. आमदार भरतजी गोगावले उपस्थितांना संबोधित करतील. प्रा. मोहन शेटे व सचिन करडे आपले मनोगत व्यक्त करतील आणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होईल.

हर घर सावरकर समितीला  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभले आहे. समितीतर्फे नुकतीच मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली शिखर परिषद संपन्न झाली व त्यामध्ये देशभरातून १०० हुन अधिक संस्था सहभागी झाल्या होत्या. शिखर परिषदेत सर्वानुमते ३ ठराव संमत करण्यात आले ते पुढील प्रमाणे १) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करणे २) महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समग्र वाङ्मय खंड स्वरूपात उपलब्ध करून देणे ३) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र शाळा तसेच सरकारी कार्यालयात लावण्याची व्यवस्था करणे. परिषदेत सर्वानुमते संमत झालेले ठराव मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री  उदय  सामंत यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: