fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यातले मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परत

मुंबई : मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 25 विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काल चर्चा केली होती, त्यानंतर आज सकाळी या विद्यार्थ्यांना इंफाळहून आसामच्या गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले. त्यानंतर आज रात्री विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले.

यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, राजशिष्टाचार अधिकारी अब्दुल अजीज बेग आणि त्यांच्या टीमने शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सुखरूप परतल्याबद्दल विद्यार्थ्यांनीदेखील राज्य शासनाचे आभार मानले.

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या परिस्थितीत अडकले असल्याचे समजताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. याचबरोबरच मुख्यमंत्र्यांनी तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तसेच त्यांना विशेष विमानाने आसाममार्गे महाराष्ट्रात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार आज हे विद्यार्थी सुखरूप परतले आहेत.

विद्यार्थ्यांनी मानले महाराष्ट्र शासनाचे आभार

मणिपूर येथील दंगलीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई येथे सुखरूप परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन प्रयत्न केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

सुखरूप परत आलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :

आदित्य गजभिये, तुषार आव्हाड, आयुष दुबे, शिवसंपत तागिरीसा, गौतम चौरसिया, साजन पौणिकर, मोहित खडपे, भूषण पावरा, वृक्षाल गणवीर, विकास शर्मा, तन्मय मादव, मडिकोंडा अविनाश, रोहित कोरी, आयुष रवी, ज्ञानदीप छुटे, प्रतिक कोडग, पुनर्वसू इंगोले, साईजित निकम, अनन्य बॅनर्जी, शंतनू कुंभीरकर, क्रिश कलगुडे, फाल्गुन महाजन, मधुरिका इंदूरकर, रोनिल नाडर आणि अश्वगंधा पराडे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading