Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

इतरांना आनंद देण्यासाठी, महिलांनी आधी स्वतः आनंदी राहायला शिकलं पाहिजे – विद्या बालन

पुणे – आपल्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या भूमिका बजावत असताना प्रत्येक महिला इतरांच्या आनंदासाठी कायम मेहनत घेत असते. पण हे सगळं करत असताना ती तिचा आनंद किंवा तिचं स्वतःचं अस्तित्वंच विसरुन जाते, अशी भूमिका अभिनेत्री विद्या बालन यांनी मांडली. फिक्की – फ्लो (FICCI, FLO) च्या पुणे चॅप्टरच्या नूतन अध्यक्षा रेखा सतीश मगर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी, ५ मे रोजी सायंकाळी संपन्न झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

विद्या बालन उपस्थितांशी संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, प्रत्येक महिला आयुष्यात अनेक भूमिका निभावत असते. ती एक पत्नी असते, बहीण, आई आणि इतरही खूप काही असते. या सगळ्या भूमिका बजावत असताना, ती कायम इतरांच्या आनंदासाठी प्रयत्नशील असते. दरम्यान तिच्या स्वतःच्या आनंदाकडे मात्र दुर्लक्ष होते.

त्या पुढे म्हणाल्या, त्यामुळे सगळ्या महिलांना माझा एकच सांगणे आहे की, त्यांनी स्वतः आधी आनंदी राहायला शिकलं पाहिजे. जर त्या आनंदी, समाधानी असतील तर इतरांना आनंदी ठेवणं त्यांना सहज शक्य आहे. यातून त्यांचं एक स्वतःच अस्तित्व निर्माण होईल, जे अतिशय गरजेचं आहे.

त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणाऱ्या फिक्की फ्लोसारख्या संस्थांचे देखील त्यांनी खूप आभार मानले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे चॅप्टरच्या नूतन अध्यक्षा सौ. रेखा सतीश मगर या होत्या. फिक्की – फ्लोच्या पुणे चॅप्टरचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे सौ.मगर यांनी त्यांच्या मनोगताच्या सुरवातीला नमूद केले.

त्या पुढे म्हणाल्या की, आगामी वर्षात आम्ही आमच्या कार्य विस्तारावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. त्याचबरोबर महिलांना उद्योगवाढीत मदत करण्याबरोबरच त्याच्यासाठी सुदृढ आणि लोकशाही पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करणार आहोत. त्यातूनच त्याच्यांमध्ये कौशल्य विकास, नावीन्य, व्यावसायिक दृष्टीकोन निर्मिती होईल व त्यांचा उद्योगातील सहभाग वाढेल आणि आर्थिक प्रगती होईल. जेव्हा ‘ती’ ची प्रगती होईल, तेव्हा जगाची देखील प्रगती होईल.

फिक्की फ्लोच्या भारतभरात १९ शाखा आहेत. त्यापैकी पुण्यातील शाखेचे हे ९ वे वर्ष आहे. ही संस्था जवळपास ८००० महिला व्यावसायिक व उद्योजिकांचे प्रतिनिधित्त्व करते आहे. गेली ४० वर्षे ही संस्था महिलांमध्ये उद्योजकता व व्यावसायिक दृष्टीकोनात वाढ व्हावी यासाठी कार्यरत आहे. त्याकरता संस्था सातत्याने वेगवेगळ्या कार्यशाळा, प्रशिक्षण, परिसंवाद व परिषदांचे आयोजन करते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गणेशवंदना अशा पारंपारिक पद्धतीने करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. रेखा मगर यांचे भाषण झाले.

कार्यक्रमाच्या शेवटी, अभिनेत्री विद्या बालन यांचे भाषण व प्रश्नोत्तरे झाली.
फिक्की-फ्लोच्या सदस्यांसोबतच, संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. वर्षा तलेरा, माजी अध्यक्षा उषा पूनावाला, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील इतरही मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान दोन महिला उद्योजकांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याची देखील संधी दिली गेली. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading