उद्धव ठाकरेंना जन की बात नाही तर धन की बात कळते – नितेश राणे यांची टीका
रत्नागिरी : उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी बारसू प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रकल्प बळजबरीनं नागरिकांवर लादू नका अन्यथा महाराष्ट्र पेटवू असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान दुसरीकडे ठाकरे यांच्या या दौऱ्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून देखील राजापूरमध्ये बारसूचं समर्थन करण्यासाठी रॅली काढण्यात आली. यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंच्या बारसू भेटीवरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील सर्वात मोठा दलाल आज बारसूत आला आहे. उद्धव ठाकरेंना जन की बात नाही तर धन की बात कळते. महाराष्ट्र पेटवण्यापेक्षा लोकांच्या चुली पेटवा. मातोश्रीवर खोके पोहोचावेत यासाठीच बारसूला विरोध सुरू आहे. उद्धव ठाकरेंची भूमिका विकासविरोधी आहे. कोकणातील जनतेचा विकास त्यांना नको आहे, अशा शब्दांमध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
