Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठ सल्लागार परिषदेची पहिली सभा संपन्न

पुणे – नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करावयाचे कार्यक्रम आणि जागतिक स्पर्धेत आपला नावलौकिक टिकवत अधिक उंची गाठण्यासाठी प्रयत्न या आणि अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज ४ मे २०२३ रोजी विद्यापीठ सल्लागार परिषदेची पहिली सभा पार पडली.

सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार राज्यपाल महोदयांनी नामनिर्देशित केलेल्या विद्यापीठ सल्लागार परिषदेची बैठक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीतील सभागृहात संपन्न झाली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतुदीनुसार ख्यातनाम उद्योगपती संजय किर्लोस्कर हे या परिषदेचे अध्यक्ष असून, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून राजेश पांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभवी, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ राज शेखर जोशी आदी परिषदेचे सदस्य आहेत.

जागतिक स्तरावर विद्यापीठाचा स्तर उंचावण्यासाठी उपाययोजना याबाबत कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषद यांना मार्गदर्शन करण्याकरिताची सदरची ही सर्वोच्च विद्यापीठ सल्लागार परिषद आहे.

सदर सभेत कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी विद्यापीठाच्या कामकाजाचा आणि विकासाचा आढावा सादर केला. तसेच विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्ष व आगामी जी २० ची बैठक याबाबतच्या योजनांची माहिती दिली. यावेळी विद्यापीठाच्या वाटचालीबाबत सल्लागार परिषदेने समाधान व्यक्त केले आणि शैक्षणिक क्षेत्रातील नवीन आव्हानांच्या पार्श्वूमीवर विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान उंचावण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला.

या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने

१) विद्यापीठाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकने
२) संशोधन, बौद्धिक स्वामित्व हक्क आणि नवोपक्रम
३) आंतरराष्ट्रीयकरण
४) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योगांशी परस्पर सहकार्य व संशोधन अनुदान तसेच विद्यापीठ अमृतमहोत्सव व जी २० आयोजनाच्या माध्यमातून विद्यापीठाचा नावलौकिक उंचावणे.

या महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून योजना आखण्यावर भर देण्यात आला व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली.

अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या प्रगतीचा आलेख सतत उंचावलेला असून आगामी काळात उपलब्ध असलेल्या जागतिक संधींचा फायदा विद्यार्थ्यांना करून देण्यासाठीच्या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.

  • संजय किर्लोस्कर, अध्यक्ष सल्लागार परिषद , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


विद्यापीठ सल्लागार परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान व सामाजिक क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यापीठाला लाभत आहे. भविष्यातील वाटचालीसाठी त्यांचे योगदान अतिशय मोलाचे ठरणार आहे.

  • डॉ.कारभारी काळे, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading