fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपयुक्त ए. राजा, पिंपरी चिंचवड परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ॲड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माणिक मोरे आदी उपस्थित होते.

यंदा दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी सोहळा होत आहे त्यामुळे सर्व विभागांनी संपूर्ण तयारी गतीने करावी, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड मनपा, नगरपरिषदा तसेच सर्व स्थानिक यंत्रणांनी पाणीपुरवठ्याबाबत दक्ष रहावे. पालखी जूनमध्ये निघणार असल्याने उष्णतेचा घटकही लक्षात घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील पालखी सोहळा हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक सोहळा असून सर्वांच्या सहभागातून शांततेत, आनंदात व सौहार्दात हा सोहळा यशस्वी करू. भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पालखी मार्ग, पालखी तळ, विसाव्यांची संयुक्त्त पाहणी केली आहे. पालखी सोहळा प्रमुखांसमवेत समन्वयाने काम सुरू आहे. पाहणी आणि बैठकीत निदर्शनास आलेल्या बाबींच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी आपापल्या विभागांकडील कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत.

पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत गतवर्षीपेक्षा वाढ करण्यात येईल. पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी. आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले.

पोलीस अधीक्षक श्री. गोयल म्हणाले, पालखीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वाहतूक वळविण्याबाबत अगोदर पूर्वप्रसिद्धी करण्यात येईल. पालखी सोहळा व्यवस्थापकांनीही पुरेसे स्वयंसेवक नेमावेत, अशीही सूचना श्री. गोयल यांनी केली.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता, अन्न व औषध प्रशासन, महावितरण आदी विभागांकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला.

बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, श्री संत तुकाराम महाराज देवस्थान, श्री संत सोपानदेव महाराज देवस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान पदाधिकारी, उपविभागांचे प्रांताधिकारी, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, महानगरपालिका, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading