माजी विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर लिखित ‘अटल- अविचल’ या आत्मकथेचे श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे : कोविड काळात उत्कृष्ट काम केलेले पुण्याचे माजी विभागीय आयुक्त व निवृत्त सनदी अधिकारी डॉ दिपक म्हैसेकर लिखित ‘अटल- अविचल’ या आत्मकथेचे प्रकाशन येत्या रविवार दि ७ मे रोजी सायं ५.३० वाजता बीएमसीसी रस्त्यावरील गोखले इन्स्टिट्यूट येथील काळे सभागृहात संपन्न होणार आहे. मनोविकास प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या या आत्मकथेचे प्रकाशन विद्यमान खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे हस्ते होईल. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर यासाठी प्रवेश देण्यात येणार असून काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील.
पुस्तक प्रकाशनावेळी माजी आमदार उल्हास पवार, निवृत्त सनदी अधिकारी व माजी संमेलनाध्यक्ष असलेले लक्ष्मीकांत देशमुख व भारत सासणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांना घेराव घालणारा विद्यार्थी ते मुख्यमंत्र्यांचा सल्लागार असा डॉ दिपक म्हैसेकर यांचा रोमांचकारी व प्रेरक प्रवास ‘अटल- अविचल’ या आत्मकथेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आला आहे.
