‘हीलिंग हार्मनी’ या सांगीतिक मैफलीतून आनंदी जीवनाचा संदेश
पुणे : डॉक्टर आणि रुग्णांनी एकत्रितरित्या केलेले गीतांचे सादरीकरण…स्तनांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारावर अतिशय उभारत्या शैलीमध्ये मार्गदर्शन आणि आहार-व्यायाम यांचे संतुलन कसे राखावे हे सूर व संवादाच्या माध्यमातून हीलिंग हार्मनी या कार्यक्रमाद्वारे पुणेकरांसमोर सादर झाले. आजारांवर मात करीत आनंदी जीवनाचा प्रवास रसिकांसमोर उलगडला गेला.
आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप, कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट व उम्मीद कॅन्सर सपोर्ट फोरम तर्फे बदलत्या जीवनशैलीवर आधारित ‘हीलिंग हार्मनी’ या कार्यक्रमाचे आयोजन बिबेवाडीतील आण्णा भाऊ साठे सभागृह येथे करण्यात आले. यावेळी प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ.शेखर कुलकर्णी आणि कर्करोगावर मात करणाऱ्या प्रतिभा कर्णिक, स्वाती देव, माधवी फडणीस यांनी गीतांचे सादरीकरण केले. कलांगण चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका चैत्राली अभ्यंकर यांनी निवेदनातून प्रेक्षकांशी संवाद साधला.
तसेच धनंजय खरवंडीकर, कविता खरवंडीकर यांनी पाहुणे कलाकार म्हणून सहभाग घेतला. यावेळी अनेक रुग्णांनी आपले अनुभव सांगत ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली.स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी आणि कर्करोग झालाच तर तो कशाप्रकारे लवकर बरा करता येईल, यासाठी कोणत्या प्रकारची आहार आणि व्यायाम आवश्यक आहे, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. पुणे शहरात नेहमीच विविध सांगीतिक कार्यक्रमाची मेजवानी नागरिकांना मिळत असते. परंतु एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली.
डॉ.शेखर कुलकर्णी म्हणाले, ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे प्रमाण अमेरिकेत ८ महिलांमागे १, युरोपमध्ये १० मागे १ आणि भारतात म्हणजे पुणे सारख्या शहरात त्याचे प्रमाण २२ महिलांमागे १, तर खेडेगावात ६५ महिलांमागे १ अशी संख्या वाढत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली, असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये आणि झालाच तर काय दक्षता घ्यावी याविषयी माहिती त्यांनी दिली.
