Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

विविध कार्यक्रमांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराष्ट्र दिन साजरा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुल विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. या दिवसाच्या निमित्ताने ध्वजारोहण देखील करण्यात आले. विद्यापीठातील विविध विभागांनी क्यू.एस वर्ल्ड रँकिंग मध्ये आघाडीचे स्थान मिळवले त्यानिमित्त डॉ.कारभारी काळे यांनी सर्व विभागांच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुकही केले. तसेच विद्यापीठाच्या अल्युमिनाय असोसिएशनतर्फे लोगो आणि टॅगलाईन संदर्भात आयोजित केलेल्या स्पर्धेचे पोस्टर अनावरणही यानिमित्ताने करण्यात आले.

महाराष्ट्र दिन साजरा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १ मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार , डॉ.पराग काळकर, डॉ.विजय खरे, डॉ.दीपक माने, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रविंद्र शिंगणापूरकर, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना उद्देशून डॉ.काळे म्हणाले, विद्यापीठाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. यात अनेक आजी माजी कुलगुरू, प्राध्यापक, सेवक यांचा वाटा आहे. मला या अमृतमहोत्सवी वर्षात हा दिवस साजरा करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठातील सुरक्षा विभागातील सुरक्षा रक्षक आणि एनसीसी युनिटने एकत्रितरित्या पथसंचलन केले.

खाशाबा जाधव क्रीडा संकुल विद्यार्थ्यांसाठी खुले
जवळपास २७ एकरात उभारण्यात आलेले खाशाबा जाधव क्रीडा संकुल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे पासून विद्यार्थ्यांना खुले करण्यात आले आहे. यासाठीची नियमावली तयार करण्यात आली असून विद्यापीठातील तसेच विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी काही नियम व अटींच्या अधीन राहून या संकुलाचा लाभ घेऊ शकतात. अथलेटिक ट्रॅक, टेबल टेनिस कोर्ट, बॅडमिंटन, इनडोअर स्पोर्ट्स हॉल मधील इतर खेळ आदींचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.

विद्यापीठाच्या ‘ अल्युमिनाय असोसिशन’ तर्फे लोगो आणि टॅगलाईन स्पर्धेचे आयोजन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अल्युमिनाय असोसिएशनतर्फे ( SPPU alumini association) विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अल्युमिनाय असोसिएशनचा लोगो आणि टॅगलाईन ठरविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, अल्युमिनाय असोसिएशनचे संचालक डॉ.संजय ढोले, संपर्क अधिकारी प्रतीक दामा हेही उपस्थित होते. १ ते १५ मे दरम्यान ही स्पर्धा होणार असून यासाठी विद्यापीठाचे सर्व आजी माजी विद्यार्थी अर्ज करू शकतात. alumini.unipune.ac.in या संकेस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी प्रवेश शुल्क असून विजेत्या विद्यार्थ्यांना ५ व १० हजारांचे रोख पारितोषिक देखील देण्यात येणार आहे.

‘क्यूएस रँकिंग’ मध्ये विद्यापीठाच्या विभागांची विशेष कामगिरी
जागतिक पातळीवरील ‘क्यू एस रँकिंग’ घोषित करणाऱ्या संस्थेने स्वतःहून काही विषयांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करत क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये विद्यापीठाच्या फार्मसी अँड फॉर्मकोलोजी या विभागाने जागतिक स्तरावर ३०१ ते ३५० या गटात स्थान मिळवले आहे. तर विद्यापीठाच्या फिजिक्स आणि अस्ट्रोनोमी आणि केमिस्ट्री विभागाला ५५१ ते ६०० या गटात स्थान मिळाले आहे. ‘ क्यू एस रँकिंग’ मध्ये विद्यापीठ कायमच वरच्या स्थानावर झेप घेत आहे मात्र विद्यापीठातील विभागांची कामगिरी देखील जागतिक दर्जाची असल्याचे सांगत कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी या सर्व विभागांचे कौतुक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading