विधा लाल यांनी सादर केलेल्या जयपूर घराण्याच्या कथक नृत्य प्रस्तुतीने रसिक मंत्रमुग्ध
भरतनाट्यम व कथक सादरीकरणाने चौथ्या ‘नुपूरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हल’ला सुरुवात
पुणे : भैरवी संगीत प्रसारक मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नुपुरनाद म्युझिक व डान्स फेस्टिव्हलला आज एरंडवणे, डी पी रस्त्यावरील मॅजेंटा लॉन्स या ठिकाणी सुरुवात झाली. भरतनाट्यम व कथक सादरीकरणाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाला प्रारंभ झाला. यावेळी जयपूर घराण्याच्या दिल्लीस्थित कथक नृत्यांगना विधा लाल यांच्या नृत्य प्रस्तुतीने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
यावर्षीच्या महोत्सवाला डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे विशेष सहकार्य लाभले असून विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते यावर्षीच्या चौथ्या महोत्सवाचे उद्घाटन आज संपन्न झाले. भैरवी संगीत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर, सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉ. स्वाती दैठणकर, कथक गुरू मनीषा साठे, भरतनाट्यम नृत्यांगना व अभिनेत्री नुपूर दैठणकर आणि तरुण पिढीचे आश्वासक संतूरवादक निनाद दैठणकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नुपूरनाद अकादमीच्या विद्यार्थिनी, गुरु डॉ. स्वाती दैठणकर आणि नुपूर दैठणकर यांच्या शिष्यांनी आपल्या नृत्यप्रस्तुतीमधून गुरु पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांना आदरांजली वाहिली. यावेळी या विद्यार्थीनींनी देवीस्तुती व शिवस्तुती प्रस्तुत केल्या.
यानंतर दिल्लीस्थित व जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध कथक नर्तिका विधा लाल यांचे कथकनृत्य सादर झाले. विधा लाल या संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध कथक गुरु गीतांजली लाल यांच्या शिष्या व स्नुषा आहेत. विधा लाल यांनी यावेळी राग बैरागी, नऊ मात्रा मध्ये ‘हरी- हर’ ही कृष्ण व शिव स्तुती प्रस्तुत करीत आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. सुप्रसिद्ध कवी वैजू बावरा लिखित ही रचना असून विधा लाल यांच्या गुरू गीतांजली लाल यांनी स्वतः ती स्वरबद्ध केली आहे.
यांनतर विधा लाल यांनी तीन तालात विलंबित लयीमध्ये शुद्ध पारंपरिक कथक नृत्य सादर केले. यामध्ये जयपूर घराण्याच्या अनेक सूक्ष्म गोष्टी त्यांनी उपस्थितांसमोर सादर केल्या. यांनतर कवी रसखान यांनी रचलेल्या ‘मोर-पखा सिर ऊपर राखिहौं…’ ही राग मियां मल्हार मधील रचना त्यांनी अभिनय व नृत्याद्वारे उपस्थितांसमोर प्रस्तुत केली.
तीन ताल व द्रुत लयीचे सादरीकरण करीत तोडे, तुकडे, तिहाई ही जयपूर घराण्याची वैशिष्ट नृत्याच्या माध्यमातून सादर करीत विधा लाल यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना अमान आली (तबला), नितीश पुरोहित (सरोद) तर शुभम खंडाळकर (गायन) यांनी साथसंगत केली
डॉ स्वाती दैठणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर निरजा आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
