‘एनसीआय’ मध्य भारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
समृद्धी महामार्गाच्या झिरो माईल शेजारी जामठा परिसरात स्थित राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे (नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट) सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. या सोहळ्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, माजी खासदार तथा उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर आदी मंचावर उपस्थित होते. तर या सेवाभावी कार्यक्रमाला विधासभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उद्योग व वाणिज्य क्षेत्रातील दिग्गज सर्वश्री गौतम अडाणी, दिलीप सिंघवी, समीर मेहता, पार्थ जिंदाल आणि जयप्रकाश रेड्डी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, (एनसीआय) या संस्थेला सेवाव्रती कार्यासाठी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मेहनतीतून ही संस्था निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी श्री. फडणवीस यांचे अभिनंदन केले. राज्यासमोर आरोग्य सेवा हे मोठे आव्हान आहे. नुकताच कोरोना संकटाचा अनुभव आपण घेतला असून हवामान बदल, उष्माघात या प्रमाणेच कॅन्सर ही मोठी समस्या म्हणून पुढे येत आहे. श्री. फडणवीस यांचे वडील, त्यांचे सहकारी श्री. शैलेश जोगळेकरांच्या पत्नी आणि माझ्या आईचा मृत्यू कॅन्सरनेच झाल्याचा उल्लेख करुन या वेदनादायी आठवणी मागे ठेवत सार्वजनिक हितासाठी लोकप्रतिनिधींनी असे दृष्य कार्य करायचे असते आणि हाच मार्ग आम्ही अवलंबिल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री असताना श्री. फडणवीस यांनी विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली व हा प्रकल्प पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी मेहनत घेतली. या घटनेचा साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले. एनसीआयची नागपुरात उभारणी करण्याची संकल्पना मांडून तिही उपमुख्यमंत्र्यांनी पूर्णत्वास नेली. घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याची त्यांची खुबी आहे. ही संस्था उभी राहणे मोठी उपलब्धी व ऐतिहासिक कामगिरी आहे. सर्व सामान्य रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. ही संस्था विदर्भासह महाराष्ट्र व मध्यभारतातील कॅन्सर उपचारासाठी आरोग्य मंदिर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संस्थेला लोकप्रतिनिधींनी भेट देऊन या कार्यातून प्रेरणा घ्यावी व आपापल्या भागात अशी सेवाव्रती आरोग्य मंदिरे उभारावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. अशा संस्थांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकार सर्व सामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आहे. ‘मुख्यमंत्री सहायता कक्ष’, ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ आणि ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ मधून भरघोस मदत करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
देशाला कॅन्सर मुक्त करण्यासाठी एनसीआय उपयुक्त ठरेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
कॅन्सरवरील उपचारासाठी आता विदर्भातील रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी न जाता एनसीआयमध्ये नागपुरातच अत्याधुनिक उपचार घेता येणार आहेत. ही संस्था उत्तम उपचार आणि संशोधनामुळे देशाला कॅन्सरमुक्त करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. अमेरिकेत कँसरच्या रुग्णांमध्ये 33 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. एनसीआय सारख्या संस्था देशात उभ्या राहिल्यास कॅन्सर रुग्णांची संख्या कमी होईल व देश या आजारापासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.
कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार पद्धती व संशोधन केंद्र उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भातील कॅन्सर रुग्णांना मुंबईसह देशाच्या अन्य भागात उपचारासाठी जावे लागत असे. यावर कायम तोडगा काढण्यासाठी 30 वर्षांपासून पाहिलेले स्वप्न एनसीआयच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा आनंद आहे. या संस्थेच्या माध्यमातून विदर्भ, महाराष्ट्रासह मध्य भारतातील कर्करोगाच्या रुग्णांना स्वस्तात उत्तम उपचार उपलब्ध होणार आहेत. हे कार्य पुढे घेऊन जात रुग्णांच्या नातेवाईकांच्या नि:शुल्क निवासासाठी येथे धर्मशाळा उभारण्यात येणार आहे. पूर्व विदर्भात थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून या आजारावर संशोधन व उपचार करण्यासाठी येत्या काळात एनसीआयमध्ये संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शैलेश जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तत्पूर्वी मान्यवरांनी एसीआयची पाहणी केली.
