Saturday, June 20, 2026
Latest NewsSports

Rollball World Cup : महिला गटातून भारत, केनिया उपांत्य फेरीत; पुरुष गटातून भारत, केनिया, बेलारूस व सेनेगल उपांत्यपूर्व फेरीत

पुणे : महिलांच्या अ गटातून केनिया तर ब गटातून भारताने सहाव्या विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुषांच्या अ गटातून भारताने, ब गटातून केनियाने, क गटातून बेलारूसने तर ड गटातून सेनेगल संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडीयम येथे सुरु असलेल्या स्पर्धेत पुरुष गटात भारतीय संघाने आर्जेन्टीना संघाला ९-१ असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत  प्रवेश केला. मध्यंतराला भारताने ४-० अशी आघाडी घेताना लढतीवर वर्चस्व मिळविले होते. आकाश गणेशवाडे  (४.४०, १५.१५, ३६.३०) व श्रीकांत साहू (१२.२७, २६.०२, ३०.०७ ) यांनी प्रत्येकी ३ , हर्षल घुगेने २ (१७.२५, २१.२७) तर आदित्य सुतारने १ (२८.५५) गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. आर्जेन्टिना संघाकडून इमिलानो जेससने (३२.१०) एक गोल केला.

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताने आर्जेन्टीना, फिजी, पोलंड, इजिप्त व युगांडा या संघाचा पराभव केला. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत सहभागी होण्यासाठी पोलंड व इजिप्त या दोन संघात चुरस आहे.

पुरुषांच्या ब गटातून केनिया संघाने सियारा लीवोन, श्रीलंका, फ्रांस व इराण संघाना पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. पुरुषांच्या क गटातून बेलारूस संघाने सौदी अरेबिया, नेपाळ, ओमान व ब्राझील संघांचा पराभव करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ड गटातून सेनेगल संघाने न्यूझीलंड, इंग्लंड, लॅटव्हिया संघाना पराभूत करताना उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.

महिला विभागातून भारताने सियारा लीवोन संघाला ९-० असे पराभूत करताना ब गटातून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. मध्यंतराला ५-० अशी आघाडी घेतली होती. इशिका शर्मा (०.५०, १६.२२), कर्णधार एस. सुस्मिथा (१८.३५, २२.५५ ), श्रुती भगत (१९.३०,२९.४०) यांनी प्रत्येकी २ तर देवांशी पटेल (३२.५०), पूजा चौधरी (१३.१५) व खुशी वानखेडे (२५.००) यांनी प्रत्येकी १ गोल केला. सियारा लीवोन संघाकडून एकाही खेळाडूला गोल करता आला नाही.

महिलांच्या ब गटातून भारताने सियारा लीवोन, पोलंड, लॅटव्हिया व आर्जेन्टिना संघाना पराभूत करताना थेट उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या स्थानासाठी लॅटव्हिया व पोलंड या दोन संघात चुरस असणार आहे.

महिलांच्या अ गटातून केनिया संघाने इजिप्त संघाला पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. याच गटातून दुसऱ्या स्थानासाठी इजिप्त व फ्रांस हे एकमेकांच्या समोर असणार आहेत.

तत्पूर्वी, साखळी लढतीमध्ये महिला गटात श्रीलंका संघाने नेपाळ संघाला ६-१ असे पराभूत करताना आगेकूच केली. मध्यंतराला ४-१ अशी श्रीलंका संघाने आघाडी घेतली होती. एम. डी. दिदुलानीने ३, नावेदाने २ तर चलानी एस ने एक गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. नेपाळ संघाकडून बितीशा महार्जनने एक गोल केला.

 

सहावी रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धा

उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेले संघ

पुरुष :

अ गट : भारत, इजिप्त

ब गट : केनिया, इराण

क गट : ओमान, बेलारूस

ड गट : सेनेगल, लॅटव्हिया

महिला :

अ गट : केनिया, इजिप्त

ब गट : भारत, पोलंड

२५.०४.२०२३

१) महिला गट : केनिया विरुद्ध पोलंड : उपांत्य फेरी : सकाळी ८.०० वाजता

२) महिला गट : भारत विरुद्ध इजिप्त : उपांत्य फेरी : सकाळी ९.३० वाजता

३) पुरुष गट : भारत विरुद्ध इराण : उपांत्यपूर्व फेरी : सकाळी ११.०० वाजता

४) पुरुष गट : केनिया विरुद्ध पोलंड : उपांत्यपूर्व फेरी : दुपारी १२.३० वाजता

५) महिला गट : पहिली उपांत्य फेरी पराभूत विरुद्ध दुसरी उपांत्य फेरी पराभूत : तिसरे स्थान : ०२.०० वाजता

६) महिला गट : पहिली उपांत्य फेरी विजेता विरुद्ध दुसरी उपांत्य फेरी विजेता : अंतिम लढत : ०३.३० वाजता

७) पुरुष गट : ओमान विरुद्ध लॅटव्हिया : उपांत्यपूर्व फेरी : ०६.०० वाजता

८) पुरुष गट : सेनेगल विरुद्ध बेलारूस : उपांत्यपूर्व फेरी : ०७.३० वाजता

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading