छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याच्या शतकपूर्तीनिमित्त अभिवादन
पुणे : आम्ही गड्या डोंगरचे रहाणारं, चाकर शिवबाचे होणार या गीताचे समूहगान करीत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय …हर हर हर महादेव चा जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्रातील १०० गडकिल्ल्यांवरील मातीचे यावेळी पूजन करण्यात आले.
इतिहास प्रेमी मंडळातर्फे शिवछत्रपतींच्या आद्य पुतळ्याचा शतकपूर्ती समारंभ सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळासमोरील शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी इतिहास अभ्यासक मंदार लवाटे, ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, राजू बलकवडे, रवींद्र पाठारे, अभिषेक मुळे, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे उपस्थित होते. या कार्यक्रमात श्री शिवाजी कुल स्काऊट गाईड खुले पथक सदाशिव पेठ व ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मंदार लवाटे म्हणाले, भारतात सगळ्यात जास्त पुतळे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व देखील तेवढेच मोठे आणि महत्त्वाचे आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश देव आणि धर्मासाठी दिले. विद्यार्थी दशेपासूनच जमेल तसा शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. देशासाठी काही केले नाही तर जीवन व्यर्थ आहे हे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातून शिकायला मिळते
मोहन शेटे म्हणाले, आज छत्रपती शिवरायांचे पुतळे महाराष्ट्रात, भारतात आणि जगभर पहायला मिळतात मध्ययुगात काही मूर्ती निर्माण झाल्या होत्या पण त्या नंतर जवळ जवळ दोनशे वर्षांचा खंड पडला. त्यांचा पहिला पुतळा पुण्यातील शिवाजी मंदिर येथे २४ एप्रिल १९२३ रोजी बसवण्यात आला. या मूर्तीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त महाराष्ट्रातील शंभर दुर्गांच्या मातीचे पुजन करून आणि सामुहिक गीताचे सादरीकरण करून मानवंदना देण्यात आली.
ते पुढे म्हणाले, १९१७ मध्ये गणपतराव गोखले यांनी महाराजांच्या पुतळ्यासाठी लोकमान्य टिळकांना पंधरा हजार रुपयाची देणगी दिली. खुन्या मुरलीधर मंदिरा मागील जागा त्या साठी निश्चित केली. टिळकांनी नेमलेले प्रसिद्ध शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांनी तंजावरच्या चित्रांचा अभ्यास करून संगमरवरी संगमरवरी पुतळ्याची निर्मिती केली. टिळकांच्या निधना नंतर न. चि. केळकर यांनी हे काम पूर्णत्वास नेले. २४ एप्रिल १९२३ रोजी त्याचे अनावरण झाले. गेली शंभर वर्षे शिवाजी मंदिर हे पुण्याच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार राहिले आहे.
