Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

युवा कलाकारांच्या सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने

स्वरनिनाद संस्थेतर्फे आयोजित ‘युवोत्सव २०२३’मध्ये सादर झाले कलाविष्कार

पुणे  : युवा कलाकारांच्या आश्वासक सादरीकरणाने युवोत्सव २०२३ चा आजचा (शनिवार, २२ एप्रिल) पहिला दिवस रंगला. तरुण पिढीला कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी स्वरनिनाद संस्थेतर्फे युवोत्सव २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गायन, वादन आणि नृत्य अशा तिन्ही कलांचा त्रिवेणी संगम या कार्यक्रमात रसिकांना अनुभवायला मिळाला. टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉल येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, स्वरनिनाद संस्थेचे अमोल व वृषाली निसळ यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात चिन्मय लेले यांच्या एकल तबलावादनाने झाली. त्यांनी तीश्र जातीतील पेशकार वाजवून चतस्र जातीत बढत सादर केली. त्यानंतर दिल्ली आणि फारुखाबाद घराण्याचे काही कायदे, तसेच तीश्र जातीतील रेला सादर केला. त्यानंतर द्रुत गतीमधे काही तुकडे वाजवून त्याच्या ताल प्रस्तुतीने आपल्या वादनाची सांगता केली. त्यांना यशवंत थिटे यांनी संवादिनीवर साथ केली.

यांनतर अमोल निसळ यांचे शिष्य शार्दुल काणे यांनी आपली गायन प्रस्तुती केली. त्यांनी राग मारवाचे प्रस्तुतीकरण केले. यामध्ये त्यांनी विलंबित एकताल व द्रुत बंदिशी प्रस्तुत केल्या. संत चोखामेळा यांच्या ‘जोहार माय बाप जोहार…’ या अभांगाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना यशवंत थिटे (संवादिनी), कार्तिक स्वामी (तबला) आणि सुरंजन जायभाय (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आलापिनी निसळ यांनी कथक नृत्य प्रस्तुत केले. यामध्ये त्यांनी रूपक तालातील रचना सादर केल्या. त्यांना कार्तिक स्वामी (तबला), यशवंत थिटे (संवादिनी) आणि जुई सगदेव (पढंत) यांनी साथ केली.

सानिका कुलकर्णी यांच्या गायनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. त्यांनी राग बिहागचे सादरीकरण केले. ‘कैसे सुख सोवे निंदरियां श्याम मुरत चित चढी…’ हा ख्याल त्यांनी सादर केला. यानंतर ‘ ले जा रे जा रे पथिकवा….’ ही मध्यलय बंदिश प्रस्तुत केली. आडाचौताल तराण्या सादर करीत त्यांनी आपल्या प्रस्तूतीचा समारोप केला. त्यांना यशवंत थिटे (संवादिनी) आणि रोहित मुजुमदार (तबला) यांनी साथ संगत केली. मधुरा ओक गद्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading