Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

“भारताची ऊर्जा सुरक्षा आणि वातावरणातील बदलाशी संबंधित उद्दिष्टांची  पूर्तता यासाठी जैव इंधनाची भूमिका महत्वाची” – इंडियन ऑइल अध्यक्ष वैद्य यांचे प्रतिपादन  

पुणे  : “भारताला कच्च्या तेलाची गरज भागवण्यासाठी आयात करण्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून रहावे लागते आणि हे परावलंबित्व कमी करण्यासाठी तसेच ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल करण्यासाठी देशात विकसित केलेल्या जैव इंधनाची भूमिका महत्वाची ठरेल. पेट्रोल मध्ये एथनॉलचे मिश्रण २० टक्के एवढे वाढविण्याचे लक्ष्य २०२५ पर्यंत पूर्ण होईल आणि आता आपण डिझेल मध्ये एथनॉल चे मिश्रण शक्य करण्याचे प्रयत्न केल्यास वाहनांमुळे होणारे उत्सर्जन कमी करणे आणि तेल आयातीसाठी खर्च होणाऱ्या परकीय चलनाची बचत या दोन्ही आघाड्यांवर मोठे यश मिळू शकेल, ” असे प्रतिपादन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांनी शुक्रवारी केले.

“जैव इंधनांच्या अधिकाधिक वापरा मुळे शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट होणे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करून समावेशक प्रगती हे शक्य होईल. पर्यावरणाची हानी न करणारी ‘हरित व्यवसायवृद्धी’ करण्यासाठी इंडियन ऑइल कटिबद्ध आहे आणि २०४६ पर्यंत “शून्य निव्वळ उत्सर्जन” हे अंतर्गत उद्दिष्ट कंपनीने निश्चित केले आहे, असे वैद्य म्हणाले.  प्राज इंडस्ट्रीज च्या ‘प्राज मॅट्रिक्स’ या औद्योगिक जैव-तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विकास केंद्राला १५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त आयोजित केलेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री वैद्य बोलत होते.  कंपनीचे अध्यक्ष डॉ प्रमोद चौधरी, व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा तसेच इंडियन ऑइल चे कार्यकारी संचालक अनिर्बाण घोष आणि मॅथ्यू वर्गीज यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रम हा उरवडे येथील ‘प्राज मॅट्रिक्स’च्या संकुलात संपन्न झाला.

विमान वाहतूक कंपन्या पर्यावरण पूरक इंधन (सस्टेनेबल एव्हीएशन फ्युएल) मिसळलेले पारंपरिक जेट इंधनाचा वापर लारून विमान वाहतूकक्षेत्र कार्बन उत्सर्जन कमी करण्यात स्वारस्य दाखवीत आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात नजीकच्या भविष्यात लागू होणा-या करारानुसार ठरलेल्या मार्गदर्शक सूत्रांनुसार (CORSIA – Carbon Offsetting and Reduction Scheme for International Aviation guidelines) असे इंधन निर्मितीचे क्षमता असणारे प्रकल्प उभारण्याच्या प्रयत्नात आहोत. भू-राजकीय परिस्थिती आणि तेलाच्या वाढत्या किमती तसेच तेल उत्पादक देशांची उत्पादन विषयक धोरणे यांचा विचार करता हे एक मोठे यशच ठरेल, असे मत वैद्य यांनी व्यक्त केले.

जैविक इंधन तंत्रज्ञानात प्राज ने केलेल्या प्रगतीचे कौतुक करून वैद्य यांनी केंद्रातील शास्त्रज्ञांना  इथेनॉल आणि डिझेल यांचे मिश्रण शक्य करील असा घटक विकसित करण्याचे आवाहन केले.  हरित हायड्रोजन च्या  निर्मितीला गती देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
प्राज इंडस्ट्रीज चे अध्यक्ष डॉ प्रमोद चौधरी म्हणाले की कंपनीने संशोधन आणि विकास नेहमीच  आपल्या धोरणांच्या केंद्रस्थानी ठेवले आहे आणि त्यामुळेच जैव ऊर्जा उत्पादने विकसित करण्यात महत्वपूर्ण प्रगती साधली  आहे. टाटा उद्योगसमूह, राकेश झुनझुनवाला, साहस वित्त गुंतवणूकदार विनोद खोसला यांसारख्यांची कंपनीतील गुंतवणूक ही कंपनीने केल्या संशोधनाधारित प्रगतीची पावतीच आहे असे ते म्हणाले.  कंपनीने आता जैव साहित्य व रसायने,  विशेषतः  जैव पद्धतीने विघटन होणारे प्लास्टिक या दिशेने काम सुरु केले आहे असेही डॉ चौधरी यांनी सांगितले.

व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा यांनी प्रास्तविक केले आणि उपस्थितांचे स्वागत केले. कंपनीचे प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी प्रमोद कुंभार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading