संत निरंकारी मिशन द्वारे विश्वव्यापी रक्तदान अभियानाचे आयोजन
पुणे : मानवतेचे मसीहा बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ दि. २४ एप्रिल हा दिवस देश विदेशात रक्तदान शिबिरांचे आयोजन करत ‘मानव एकता दिवस’ या रूपात साजरा केला जातो. दर वर्षा प्रमाणे याही वर्षी मानव कल्याणार्थ संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून भारत देशातील मिशनच्या बहुसंख्य शाखांसह मिशनचे पुण्याचे मुख्यालय असलेल्या गंगाधाम येथील सत्संग भवनमध्ये देखील रक्तदानाचे महाअभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये मिशनचे अनुयायी मोठ्या संख्येने स्वेच्छेने व उत्स्फूर्तपणे रक्तदान करतील.
संत निरंकारी मंडळाचे पुणे झोनचे झोनल प्रमुख ताराचंद करमचंदानी यांनी या अभियानाची माहिती देताना सांगितले, की हे महाअभियान भारतातील संत निरंकारी मिशनच्या सर्व ९९ झोन मधील बहुसंख्य शाखांमध्ये राबविले जाईल. त्यामध्ये रक्तदान शिबिरांच्या आयोजनापूर्वी केली जाणारी तपासणी व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. त्या बरोबरच रक्तदात्यांसाठी चहापानाची उचित व्यवस्था केली जाणार आहे. रक्त संकलनासाठी ससून रुग्णालय रक्तपेढी, संत निरंकारी रक्तपेढी , यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी , कमांड हॉस्पिटल रक्तपेढी व अन्य सरकारी रक्त पेढ्यांचे प्रशिक्षित कर्मचारी येणार आहेत. मिशनचे सेवादार संपूर्ण आठवडाभर गंगाधाम परिसरातील घराघरांमध्ये जाऊन नागरिकांना रक्तदानाविषयी जागरूक करत आहेत. ठिकठिकाणी पथनाट्य,रॅली च्या माध्यमातून प्रेरणा देखील दिली जात आहे.
