महाराष्ट्र आणि आसाम राज्याचा सांस्कृतिक मेळावा ‘लोककलेचा वसंतोत्सव’ शनिवारी
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि असोमी यांच्यावतीने आयोजनराज्यांच्या लोककला आणि खाद्यप्रकारांचा घेता येणार आनंद
पुणे : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि आसाम येथील असोमी ही सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २२ एप्रिल रोजी महाराष्ट्र आणि आसाम राज्याचा ‘लोककलेचा वसंतोत्सव’ हा सांस्कृतिक मेळावा होणार आहे. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् च्या एरंडवणे येथील शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात हा मेऴावा होईल. अशी माहिती स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा.शारंगधर साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नृत्यविभाग प्रमुख देविका बोरठाकूर, असोमी संस्थेचे अध्यक्ष कर्नल तरुण बोरा (निवृत्त), उपाध्यक्ष मौशमी दत्ता बोरा, सांस्कृतिक विभाग प्रमुख चिरंजीब शर्मा यावेळी उपस्थित होते. मेळाव्याच्या निमित्ताने सांस्कृतिक आणि सामाजिक एकोपा वाढीस हातभार लागणार आहे. सांस्कृतिक मेळाव्यास भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम व शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम उपस्थित राहणार आहेत.
या सांस्कृतिक मेळाव्यात आसामचे नामवंत नृत्य व वाद्य कलाकार तसेच स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. मेळाव्याचे हे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्राचे लोकनृत्य, लोकसंगीत, लोकगीत हे कलाप्रकार कलाकार सादर करणार आहेत. पोवाडा, गौळणी, शास्त्रीय सुगम संगीत, सुफी संगीत, लावणी, डोळ्यांचे पारणे फेडणारे कथक नृत्य यासोबत आसामचे लोकप्रिय बिहू लोकनृत्य, आदिवासी लोकनृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे.
मेळाव्यात आसाम व महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची चव देखील चाखता येणार आहे. यावेळी हस्तकलांचेही प्रदर्शन भरणार आहे. तसेच आसाममधील पर्यटनाची माहिती देणारे मार्गदर्शक सत्र देखील होणार आहे. मेळाव्यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची पेंटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
