Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

माझी पहिलीच मालिका झी मराठीची असल्याने माझा आनंद गगनात मावत नाही : तन्मय जक्का

१. लवंगी मिरची ह्या मालिकेबद्दल काय सांगशील ?

ह्या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर ‘ही मालिका नेहमीच्या डेली सोप मालिकेपेक्षा वेगळी आहे.  जेव्हा झी मराठी टीमने मला या मालिकेसाठी संपर्क केला तेव्हा मला वाटले की ही खूप वेगळी गोष्ट आहे. हे पात्र या मालिकेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे, आणि ही मालिका त्या सर्व स्त्रियांचे प्रतिनिधित्व करत आहे स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न करतायत.

२. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?
‘निशांत’ या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर तो खूप हळवा आहे. पण तरुण रक्त असल्यामुळे तितकाच हटके, रावडी आणि डॅशिंग असा मुलगा आहे. तो मुंबई-पुणे अश्या ठिकाणावरून शिकून आला असला तरी तो जे सध्या वसुलीचं काम करतोय त्याचं कारण म्हणजे त्याच्या वडिलांना झालेली दुखापत व त्यांच्यावर झालेल्या हल्ला. त्यामुळे त्याला वडिलांचा व्यवसाय स्वतःच्या हातात घेऊन आईबरोबर सांभाळावा लागतोय. निशांत खूप वेगळा आहे, आणि जे काही काम असेल ते प्रेमाने करीन अशी त्याची मानसिकता आहे. म्हणूनच त्याचं म्हणणं असतं की “काळजातच राहायचं, डोस्क्यात नाय जायचं” कारण ‘दल दल साफ करायची असेल तर स्वतः दलदलित उतरावं लागतं.’ या सगळ्यात अस्मिचा तिखटपणा आणि राधाक्का च्या मायेमुळे त्याच्या स्वभावात पण सकारात्मक बदल घडतो. आणि त्याच्या कुटुंबाकडून प्रेमाचा असलेला अभाव देखील त्याला राधाक्काकडून मिळतो.

३. तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील ?

सहकलाकारांबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला जेव्हा कळलं कि ‘लवंगी मिरची’ मालिकेमध्ये मध्ये एवढी कमाल स्टार कास्ट आहेत, तेव्हा सुरुवातीला मी खूप बावरलो. ही माझी पहिलीच मालिका आहे, त्यामुळे मी या सर्व मोठ्या कलाकारांसोबत परफॉर्म करायचं खूप टेन्शन घेतलं होतं. पण नंतर जसं शूटिंग सुरु झालं तसं  जाणवलं की प्रत्येकजण मला खूप मदत करत आहेत, मला सांभाळून घेत आहेत. त्यामुळे आता मला सगळ्यांसोबत काम करायला खूप मज्जा येऊ लागली आहे आणि मी शूटिंग प्रोसेस एन्जॉय करायला लागलो आहे.

४. तुमच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांग/ आता पर्यंतचा प्रवास ?

ही माझी पहिलीच मालिका आहे. ‘रमणबाग’ शाळेत असल्यापासून रवींद्र सातपुते सरांच्या मार्गदर्शनाखाली मी नाटक शिकू लागलो. नंतर मी माझे शिक्षण अभियांत्रिकीमध्ये घेतले आहे. त्याचदरम्यान आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमधून आणि राज्यनाट्य स्पर्धा करत असताना मिळत जाणाऱ्या पारितोषिकांमुळे माझ्या नाट्यप्रवासाला अजून ऊर्जा मिळाली. झी मराठीने आणि संगीत कुलकर्णी सरांनी मला जी संधी दिलीये त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मी आणि माझे कुटुंब झी मराठीच्या सर्व आयकॉनिक मालिका खूप आधीपासून फॉलो करायचो. तेव्हापासुन एक कलाकार म्हणून मला वाटायचं की झी मराठीसारख्या मोठ्या व्यासपीठावर मला एखादी छोटी भूमिका मिळाली तरी ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. आणि जेव्हा झी मराठीच्या मालिकेत प्रमुख भूमिका मिळणे हे स्वप्न सत्यात उतरलं तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता. यामुळे मेहनत करत राहण्यावरचा माझा विश्वास अजून दृढ झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading