Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENTLatest News

संस्मरणीय असा वाढदिवस!


एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मध्‍ये बिमलेशची भूमिका साकारणारी सपना सिकरवारचा लवकरच  वाढदिवस आहे. अभिनेत्री यंदा तिचा पती व प्रिय मुलीसोबत तिचा वाढदिवस साजरा करण्‍यास उत्‍सुक आहे. वाढदिवसाच्‍या प्‍लॅनबाबत सांगताना सपना सिकरवार म्‍हणाली, ‘‘माझे जीवन माझे पती त्रिलोक सिंग व मुलगी मान्‍या यांच्‍या भोवती गुंफलेले आहे. मी माझ्या जीवनातील या उत्‍साही व्‍यक्‍तींसोबत वाढदिवस साजरा करणार आहे. आम्‍ही जवळच्‍या मंदिरामध्‍ये जाऊन देवाचा आशीर्वाद घेणार आहोत, त्‍यानंतर गरजूंना घरगुती जेवणाचे वाटप करणार आहोत. माझ्यासाठी ही वार्षिक प्रथा आहे. यामधून मला यशाची भावना मिळते आणि माझा दिवस अधिक खास होतो. त्‍यानंतर आम्‍ही जवळच्‍या समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहोत. माझी मुलगी आणि मला समुद्रकिनारी असलेल्‍या वाळूवर धमाल करत वेळ व्‍यतित करायला आवडते. पण या दिवसाचा सर्वात उत्‍साहवर्धक भाग असणार आहे त्‍यांच्‍यासोबत, तसेच काही जिवलग मित्रांसोबत डिनर. मी माझ्या व्‍यस्‍त शूटिंग वेळापत्रकामुळे क्‍वचितच त्‍यांना भेटते.’’

सर्वात संस्‍मरणीय वाढदिवसाला उजाळा देत सपना म्‍हणाली, ‘‘माझा वाढदिवस नेहमीच खास राहिला आहे आणि मला माझ्या प्रियजनांसोबत वाढदिवस साजरा करायला आवडतो. पण मी एक वाढदिवस कधीच विसरणार नाही, ज्‍यावेळी माझ्या डोळ्यांमध्‍ये आनंदाश्रू आले होते. माझ्या सुरूवातीच्‍या संघर्षमय दिवसांमध्‍ये त्रिलोकने मला पाठिंबा दिला. त्‍यावेळी आमच्‍यामध्‍ये नाते जमले होते. त्‍यावेळी माझ्या वाढदिवसाला त्‍याने मला शुभेच्‍छा दिल्‍या नाही. सुरूवातीला मला वाटले की, तो मला मुद्दाम शुभेच्‍छा देणे टाळत आहे आणि नंतर शुभेच्‍छा देईल. पण जसा दिवस सरत गेला तसे त्‍याने मला कॉल केला नाही किंवा मेसेज देखील केला नाही, ज्‍यामुळे मी नाराज झाले. शेवटी मी त्‍याला सायंकाळी भेटण्‍याचे ठरवले. पण मी त्‍याच्‍या घरी पोहोचल्‍यावर त्‍याच्‍या घराच्‍या दरवाजा बंद असल्‍याचे दिसले. तो माझे कॉल्‍स उचलत नव्‍हता किंवा माझ्या मेसेजेसना प्रतिक्रिया देखील देत नव्‍हता. मला अस्‍वस्‍थ वाटू लागले आणि जवळपास मी रडणारच होते. पण अखेर, त्‍याने दरवाजा उघडला आणि मला सरप्राइज मिळाले. त्‍याने संपूर्ण घर गुलाब, माझ्या आवडत्‍या फुलांसह सजवले होते आणि आमचे जिवलग मित्र देखील तेथे मला सरप्राइज देण्‍यासाठी उपस्थित होते. ते पाहून मी इतके भावूक झाले की, माझ्या डोळ्यांमध्‍ये आनंदाश्रू आले. तो देखील माझी प्रतिक्रिया पाहून अचंबित झाला आणि त्‍याच्‍या डोळ्यांमध्‍ये देखील अश्रू तरळले. त्‍याने माझा दिवस खास करण्‍यासाठी घेतलेली मेहनत मी कधीच विसरणार नाही. माझ्या जीवनात तो असल्‍याने मी स्वत:ला भाग्‍यवान मानते आणि आशा करते की, प्रत्‍येक वाढदिवस त्‍याच्‍यासोबत साजरा करायला मिळेल.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading