डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शांततापूर्ण संघर्षाचा मार्ग प्रस्थापित केला
पुणे – शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वीकारण्यात आलेल्या प्रस्थापित मार्गाच्या पलीकडे जात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मैत्री, प्रेम हा शांततापूर्ण सामाजिक संघर्षाचा मार्ग प्रस्थापित केला असल्याचे मत अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना ग्रीन्स बोरो विद्यापीठातील प्रा. डॉ.जेरेमी रिंकर यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागातर्फे ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शांतता व संघर्ष व्यवस्थापन ‘ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. रिंकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी श्रीनिवास सोहनी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे , मेलबर्न विद्यापीठातील ऑस्ट्रेलिया-इंडिया इन्स्टिटयूटच्या डॉ. ब्रीजिड फ्रीमन व फ्लेम्स विद्यापीठाचे प्रा. रॉजर लुई चर्चक यावेळी उपस्थित होते.
रिंगर पुढे म्हणाले, संघर्ष हे हिंसा आणि त्याच्या विरोधातील शांतता या एवढ्याच काळया आणि पांढऱ्या बाजूंवर न मानता सामाजिक परिवर्तनाचा मार्ग म्हणून त्यांनी प्रस्थापित केले. त्यांच्यामुळे संघर्षांना सामाजिक बदलांचे इंजिन म्हणून पाहिले जाऊ लागले.
डॉ. ब्रीजिड फ्रीमन म्हणाले, डॉ. आंबेडकर हे सामाजिक न्याय आणि समतेसाठी जागतिक स्तरावर मान्यता असलेले विचारवंत आहेत, ज्यांनी समाजाच्या उभारणीसाठी आणि पुनर्रचनासाठी शिक्षणावर भर दिला. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे असे मानले. तर प्रा. रॉजर लुई म्हणाले की जागतिक महाशक्तीच्या राजकारण पुन्हा जग पाहते आहे. परंतु पूर्वेकडील देशांमध्ये सामाजिक समता अत्यंत महत्वाची आहे. बौद्ध धर्मात सामाजिक बदल घडवण्याची क्षमता आहे पण याचवेळी त्याच्या मर्यादांची जाणीव असणे आवश्यक आहे.
श्रीनिवास सोहनी म्हणाले, नागरी समाजाचा पाया भक्कम करण्यासाठी मानवी हक्क आणि आपल्या हक्कांची जाणीव आवश्यक आहे हे डॉ.आंबेडकरांनी जाणले होते, ते दूरदर्शी विचारवंत होते.
यावेळी डॉ.विजय खरे यांनी प्रास्ताविक केले. या व्याख्यानाला अनेक परदेशी विद्यार्थी उपस्थित होते.
