काश्मीर संस्कृती केशराप्रमाणे संपूर्ण भारतभर बहरेल : पद्मश्री गिरीश प्रभुणे
पुणे : ‘त्रिपुरसुंदरी’ म्हणून शंकराचार्यांनी वर्णन केलेले काश्मीर हे भारताचे हृदय आहे. मात्र गेल्या 20 वर्षांत काश्मिरातील तसेच देशभरातील युवा पिढीने तोफांचेच आवाज ऐकले. स्वप्नातील काश्मीर ‘वितस्था’ महोत्सवातून पुण्यात अवतरले आहे. भविष्यात काश्मीरची संस्कृती केशराप्रमाणे सर्वत्र बहरेल, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला.
आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे एमआयटी वर्ल्ड पीस सेंटर यांच्या सहयोगाने एमआयटी वर्ल्ड पीस सेंटर, कोथरूड येथे आयोजित वितस्था (काश्मीर) महोत्सवातील समारोप सोहळ्यात प्रभुणे बोलत होते. आझादी का अमृत महोत्सवाच्या संचालिका प्रियंका चंद्रा, काश्मिरी संस्कृतीचे अभ्यासक आणि वितस्था महोत्सवाचे नॉलेज पार्टनर सिद्धार्थ काक, आझादी का अमृत महोत्सवाच्या सल्लागार गौरी बसू, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटीचे डॉ. महेश थोरवे, व्यासपीठावर होते. प्रभुणे यांचे स्वागत प्रियंका चंद्रा यांनी केले.
डॉ. प्रभुणे म्हणाले, महाराष्ट्रातील गोंड, भिल्लांचे मूळ काश्मीरशी मिळते जुळते आहे. भाषा, संस्कृती, परंपरा सर्वत्र समानच आहेत. भारत-चीन-पाकिस्तान या देशांनी वेढलेला काश्मीर विभागला गेला आहे, असा समज आहे, परंतु काश्मीरची भूमी, काश्मिरी माणसे यांचे कधीही विभाजन झालेले नाही. या महोत्सवाद्वारे काश्मीर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मिलन होताना दिसत आहे. पुढचे युग हे काश्मीरचेच युग ठरेल.
वितस्था महोत्सवाच्या निमित्ताने काश्मीरची संस्कृती जवळून अनुभवता आली, असे डॉ. महेश थोरवे म्हणाले. सिद्धार्थ काक यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.
महोत्सवाच्या आयोजनात सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी, गोपाळ बेटावार, कार्यक्रम अधिकारी शशांक दंडे, दीपक पाटील, जगानन शेळके इतर कर्मचाऱ्यांसह स्थानिक समन्वयक चित्रा देशपांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
