ममता फाऊंडेशनमधील ५० मुलांना शालेय साहित्य व दप्तरांची भेट
पुणे : गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळ व सेवा सहयोग तर्फे कात्रज गुजर निंबाळकरवाडी येथील ममता फाऊंडेशन या अनाथाश्रमातील ५० मुला-मुलींना शालेय साहित्य व दप्तरांची भेट देण्यात आली. देणे समाजाचे या उपक्रमांतर्गत दरवर्षी विविध सामाजिक संस्थांतील मुलांना ही मदत दिली जाते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड, जनता सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र हेजीब, माजी नगरसेवक दिनेश धाडवे, अभिनेता अजय तपकीरे यांसह केतन भागवत, सचिन चौधरी, रोहित शिंदे, रमेश चोरघे, अमोल कदम, संजय सकट, मनीष शिंदे , गौरव मळेकर, संग्राम साळुंके, संतोष शिंदे, विलास धुमाळ, राजेश रजपूत हे मंडळाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. रवींद्र्र हेजीब यांनी प्रभू श्रीराम जन्माविषयी माहिती देऊन सुंदर असे गीत सादर केले.
राम बांगड म्हणाले, सामाजिक संस्थेमधील मुला-मुलींना मिळणा-या संधीचे त्यांनी सोने करायला हवे. आयुष्य मोठे व सुंदर आहे, फक्त आपल्याला ते जगता आले पाहिजे. प्रयत्न, मेहनत केली, तर मोठे होता येते. प्रत्येक मुलाचा शारिरीक व मानसिक विकास गरजेचा आहे. त्याकरिता अभ्यासासोबतच व्यायामही महत्वाचा आहे.
केतन भागवत म्हणाले, ज्याप्रमाणे आपण आई-वडिलांसाठी करतो, त्याप्रमाणेच सामाजिक संस्थांकरिता आपण काम करायला हवे. समाजासाठी काहीतरी करायचे हा विचार प्रत्येकामध्ये रुजायला हवा. मन स्वच्छ असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील, तर आपल्या हातून सामाजिक कार्य घडते, असेही त्यांनी सांगितले.
