fbpx

युगुलगीते, अभंग, गवळणीतून पुणेकरांना सांगीतिक मेजवानी

पुणे : लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे… श्रावणात घन निळा बरसला…आम्ही आनंदे नाचू गाऊ…खुलते इथे कळी…राधा ही बावरी…बाई माझ्या गं दुधात नाही पाणी… कानडा राजा पंढरीचा या भक्ती, युगुलगीत, अभंग आणि गवळण अशा विविध गीत प्रकारांच्या सादरीकरणाने गायक ऋषिकेश रानडे, धवल चांदवडकर, शरयू दाते यांनी अप्रतिम सांगितीक मेजवानी रसिक श्रोत्यांना दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पाचव्या दिवशी गायक ऋषिकेश रानडे, धवल चांदवडकर, शरयू दाते व सहका-यांनी ‘अनुभूती’ हा कार्यक्रम सादर केला.

धवल चांदवडकर यांनी ‘सूर निरागस हो’ या गीताने मैफलीची जोरदार सुरुवात केली. त्यानंतर शरयू दाते हिने ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ हे अप्रतीम गीत सादर केले.
ऋषीकेश रानडे यांनी पुलंची ‘शब्दावाचून कळले सारे’ ही रचना सादर करुन प्रेक्षकांची दाद मिळवली, मंगेश पाडगावकर यांची रचना ‘लाजून हसणे अन्‌ हसून हे पहाणे’…’श्रावणात घन निळा बरसला’ या गीतांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

अभंग छंदाची निर्मिती करणारे संत नामदेव महाराजांचे ‘विठ्ठल आवडी प्रेमभाव’ , ‘देहासी आला खाऊ..आम्ही आनंदे नाचू गाऊ’ हे अभंग सादर करीत भक्तीमय वातावरण गायकांनी निर्माण केले. भय इथले संपत नाही ग्रेस यांनी लिहिलेले भावगीत सादर होताच श्रोत्यांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली. मैफलीची सांगता ‘माऊली माऊली’ या गीताने झाली. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले

संगीत महोत्सव दि. ३० मार्च पर्यंत होणार असून यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: