fbpx

तलवारबाजी खेळासाठी सकारात्मक पाठींबा हवा – सी ए भवानी देवी

पुणे : “आज तलवारबाजी या खेळाबद्दल नव्या पिढीमध्ये दिसत असलेला उत्साह पाहून आनंद होत आहे. त्यामुळेच देशात तलवारबाजी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याबरोबरच विशेष म्हणजे पालकांमध्ये या संदर्भात असलेली उत्सुकता खऱ्या अर्थाने महत्वाची आहे. या खेळासाठी पालकांकडून सकारात्मक पाठिंबा मिळणे ही बाब महत्वपूर्ण आहे”, असे प्रतिपादन टोकिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या तलवारबाज सीए भवानी देवी यांनी केले.

३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेच्या औपचारिक समारंभात महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतेज पाटील यांच्या हस्ते सीए भवानी देवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महासंघाचे सचिव राजीव मेहता, कोषाध्यक्ष बशीर अहमद, सहसचिव देवेंद्र साहू, माजी सहसचिव अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी महासंघाचे सचिव उदय डोंगरे, सल्लागार अविनाश दुधाने, कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे, पदाधिकारी राजकुमार सूर्यवंशी आणि अभय काटेकर, डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे पदाधिकारी अॅडमिरल विक्रम सिंग आदी यावेळी उपस्थित होते.

भारतीय तलवारबाजी महासंघातर्फे आणि महाराष्ट्र तलवारबाजी महासंघ व डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ मार्च या कालावधीत ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाळुंगे–बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये सदर स्पर्धा सुरु असून याचा औपचारिक उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला. या स्पर्धेत देशभरातून ३० संघ आणि तब्बल ६०० खेळाडू सहभागी झाले आहेत.

खेळाडूमध्ये असलेली क्षमता यांबरोबरच प्रशिक्षक, पालक, राज्य व राष्ट्रीय स्तरावर संघटनेचा पाठींबा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या सर्व गोष्टी मला मिळाल्या त्यामुळेच मी ऑलिम्पिकमधील कामगिरी करू शकले, असे सांगत भवानीदेवी पुढे म्हणाल्या, “मागील महिला सेबर वर्ल्ड कपमध्ये तब्बल १२ महिला तलवारबाज आपल्या देशाच्या वतीने सहभागी झाल्या होत्या ही मोठी गोष्ट आहे.” नवोदित खेळाडूंनी भरपूर सराव करा, श्रम घ्या, तुमचे ध्येय ठरवीत ते पादाक्रांत करण्यासाठी प्रामाणिक कष्ट करा असा कानमंत्रही भवानी देवी यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार या शस्त्राला महत्त्व देत स्वराज स्थापनेला सुरुवात केली. आज महाराष्ट्रात होत असतेली ही ३३ वी राष्ट्रीय स्पर्धा आमच्यासाठी भूषणावह आहे असे सांगत भारतीय महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतेज पाटील म्हणाले, “आज देशात इतर खेळांच्या बरोबरीने तलवारबाजी या खेळालाही लोकप्रिय बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी संघटनात्मक प्रयत्न गरजेचे आहेत.”

Leave a Reply

%d bloggers like this: