Tuesday, June 9, 2026
Latest NewsPUNE

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिरात गुढीपूजन करण्यात आले. बँडचे मंगलध्वनी, रांगोळीच्या पायघडया आणि साखरेच्या गाठींच्या आकाराची फुलांची आकर्षक आरास अशा मंगलमय वातावरणात गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा झाला. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्या हस्ते गुढीपूजन करुन गणरायाची आरती करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विश्वस्त कुमार वांबुरे, अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी, विलास रासकर आदी उपस्थित होते. प्रभात बँड मधील कलाकारांनी गणरायाचरणी सेवा अर्पण केली. यावेळी गणेशयाग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

संदीपसिंह गिल्ल म्हणाले, नवीन वर्ष सुख, शांती व आनंदाचे जावो, यासाठी आपण गणरायाचरणी नतमस्तक होत आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिराचा देखील वर्धापनदिन आहे. ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने सुरु आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मानवसेवेचा वसा असाच पुढे सुरु राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

माणिक चव्हाण म्हणाले, गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान म्हणजेच दि. २२ ते ३० मार्च पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading