fbpx

शाश्वत कृषी उन्नतीतूनच मराठवाड्याचा विकास शक्य

मराठवाडा जनविकास संघातर्फे आयोजित चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर
पिंपरी : शाश्वत कृषी उन्नतीतूनच मराठवाड्याचा विकास शक्य आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळता येतील, तसेच बेरोजगारांना स्थानिक पातळीवरच हाताला काम देऊन स्थलांतर टाळता येणे शक्य आहे, आदी विषयांवर तज्ज्ञांनी विचार व्यक्त करीत सशक्त मराठवाड्याविषयी विकासात्मक संकल्प करण्यात आले.

निमित्त होते, मराठवाडा मुक्तीसंग्राम व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने पिंपळे गुरव येथे आयोजित ‘शाश्वत कृषी उन्नतीतून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास’ विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांनी विचार व्यक्त केले. भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख चंदन पाटील, मराठवाडा शाश्वत कृषी विकास योजना समन्वयक शशिकांत गव्हाणे व प्रकल्प प्रमुख अनिल व्यास यांनी मराठवाड्याच्या संदर्भात चर्चा केली.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, मराठवाडा सेंद्रीय कृषी विद्यापीठ संकल्पक दिलीप बारडकर, मराठवाडा प्रतिष्ठानचे प्रकाश इंगोले, मराठवाडा विकास महासंघाचे अध्यक्ष भारत गोरे, गया फांऊडेशनचे अध्यक्ष डी. एस. राठोड, उद्योजक शंकर तांबे, राष्ट्रभक्ती संस्करण फांऊडेशनचे नितीन चिलवंत, बळीराम माळी, अमोल लोंढे, मराठवाडा विद्यार्थी आघाडी प्रमुख मारुती अवरगंड आदी उपस्थित होते.

या चर्चासत्रात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी चांगल्या योजना व समन्वयकातून प्रश्न सोडविणे, मराठवाड्यातील स्थलांतर थांबविणे, महिलांकडे घरातील आर्थिक कारभार देऊन महिला सक्षमीकरणाचे परिवर्तन घडविणे, मराठवाड्यात कृषी क्षेत्रावर आधारीत प्रक्रीया उद्योगावर भर देऊन यशस्वी उद्योजक तयार करणे, शाळा-महाविद्यालयातील युवकांना कमवा व शिका योजनेतून आर्थिक सक्षमीकरण करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप बारडकर यांनी केले. भारतीय किसान संघाचे चंदन पाटील यांनी ५ वर्षांचा मराठवाडा विकासाचा आराखडा मांडला. अनिल व्यास यांनी गोसंवर्धन मराठवाडा भूमिचा विकास यावर विचार व्यक्त केले. शशिकांत गव्हाणे यांनी एकसंघ मराठवाडा गट व विकासाची भूमिका व्यक्त केली. अरुण पवार यांनी मराठवाडा कृषी उन्नती प्रकल्प यशस्वी राबविण्यासाठी भव्यदिव्य स्नेह मेळावा आयोजनाची भूमिका व्यक्त केली. नितीन चिलवंत यांनी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी विकासासोबत छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रीक हब हे सेंद्रिय पंचतारांकित एमआयडीसी’त व्हावे. तसेच केंद्र सरकारचे आयआयटी महाविद्यालय व्हावे, ही भूमिका मांडली.
सूत्रसंचालन बळीराम माळी यांनी, तर आभार अमोल लोंढे यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: