fbpx

पुस्तकी ज्ञानापलिकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाने प्रोत्साहन द्यावे योगेश सोमण यांची अपेक्षा

पुणे : शिक्षक हा सदैव शिक्षकच असतो. शिक्षकांच्या कार्याची त्यांच्या योग्य वयात दखल घेतली गेल्यास शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना उर्जा मिळू शकते. शिक्षकाने पुस्तकी ज्ञानापलिकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीला प्रोत्साहन देणे अपेक्षित असते, असे प्रतिपादन अभिनेते योगेश सोमण यांनी केले.
मातृभाषा चळवळ आणि शिक्षण परिसंस्थेच्या गुणात्मक विकासासाठी कार्यरत असलेल्या पुण्यातील शिक्षणविवेक आणि सामाजिक कार्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सांगलीतील टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘शिक्षण माझा वसा 2023′ या उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी योगेश सोमण बोलत होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे संस्थापक पुरुषोत्तम लोहिया, शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र अलुरकर, छत्रपती शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष विश्वास सोनवणे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक सविता काजरेकर, शिक्षणविवेकचे महेश पोहनेरकर, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर, लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनचे चेअरमन डॉ. किशोर लुल्ला, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक सीमा कांबळे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर व्यासपीठावर होते.
सोमण पुढे म्हणाले, शिक्षणासाठी नाटक हे प्रभावी माध्यम असून शिक्षकांनी या कलेचा उपयोग शिक्षण देण्यासाठी केल्यास विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन प्रभावीपणे होईल. या करिता शाळांनी नाट्य अभ्यासाच्या कार्यशाळा नियमित घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच पुढील पिढीसाठी शिक्षक निर्माण करणे आवश्यक आहे, असे डॉ. सुरेंद्र अलुरकर म्हणाले. डॉ. किशोर लुल्ला म्हणाले, समाजसुधारणेची जबाबदारी प्रत्येकाची आहे. समाजकार्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतल्यास सामाजिक चित्र बदलू शकेल. उपक्रमशील शिक्षकांचे कार्य समाजापुढे आणणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त पहिल्या दलित स्त्री आत्मकथनकार शांताबाई कांबळे यांचा ‘शिक्षक ते शिक्षणाधिकारी’ असा प्रवास उलगडून दाखविणारा ‘माज्या जल्माची चित्तरकथा..’ हा दीर्घांक सादर करण्यात आला.
प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. अर्चना कुडतरकर यांनी केले. सूत्रसंचालन मानसी दीक्षित आणि ज्योती पोकळे यांनी केले.
पुरस्कारार्थी
राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद शाळा – भाषा विभाग – सोहनी पुरनाळे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाबुर्डी, अहमदनगर). गणित विभाग – धनश्री पासलकर (जिल्हा परिषद शाळा, शेलार, मेमाणवाडी, दौंड, पुणे). विज्ञान विभाग – रजनिकांत मेंढे (जिल्हा परिषद शाळा, गोऱ्हे बुद्रुक). तंत्रज्ञान विभाग – सुरेंद्र राउत (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सवरपाडा, ता. मोखाडा, जिल्हा पालघर). कला विभाग – प्रितम सातपुते (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आठफाटा, बारामती, पुणे). विशेष विभाग – श्रीकांत पाटील (जिल्हा परिषद, पूर्व प्राथमिक शाळा, सालपे, क्र. 1, तालुका लांजा, रत्नागिरी). उपक्रमशील मुख्याध्यापक – दीपक माळी (जिल्हा परिषद शाळा, माळीवस्ती, हरोली, कवठेमहांकळ).
शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी पुरस्कार – भूषण भोये (मएसो, कै. ग. भि. देशपांडे विद्यालय, बारामती). नयना गवारी (छत्रपती शिक्षण मंडळ, श्रीमती राधाबाई साठे माध्यमिक विद्यालय, डोंबिवली). निरजा बेलसरे (डेक्कन एज्युकेश सोसायटी, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे). स्वाती कानडे (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, नऱ्हे, पुणे). प्रीती शेटे (शिक्षण प्रसारक मंडळी, शि. प्र. मं. मराठी माध्यम शाळा, निगडी). अनुराधा लाहोरकर (भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाई). माधुरी बर्वे (मुख्याध्यापक, डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे).

Leave a Reply

%d bloggers like this: