क्रेडाई पुणे मेट्रो’च्या पुढाकाराने पुणे आणि पिंपरी- चिंचवड येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा
पुणे : क्रेडाई पुणे मेट्रो संघटनेच्या पुढाकाराने पुणे आणि पिंपरी- चिंचवड येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या सुरक्षा सप्ताहाचा समारोप सोहळा नुकताच कल्याणीनगर येथील पंचशील ईस्ट साईड बिझनेस पार्क येथे संपन्न झाला.
याप्रसंगी अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक कामगार आयुक्त गजानन शिंदे, क्रेडाई पुणे मेट्रो’चे आश्विन त्रिमल, पंचशील ग्रुप’चे अध्यक्ष अतुल चोरडिया, प्रकल्प व्यवस्थापक संतोष कोळेकर, सुरक्षा प्रमुख नितीन वानखेडे, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर, कामगार कल्याण समितीचे सह-संयोजक मिलिंद तलाठी, पराग पाटील, कामगार अधिकारी समीर पारखी, समितीचे सदस्य कुणाल बांठिया हे उपस्थित होते. तब्बल ४०० हून अधिक बांधकाम कामगारांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमात क्रेडाई पुणे मेट्रो या संस्थेतर्फे विविध पुरस्करांचे वितरणदेखील करण्यात आले. यावेळी बांधकाम कामगारांच्या मुलांनी सुरक्षा, बालहक्क याविषयावर नृत्य आणि नाटक सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गिरवे यांनी केले.यावेळी बांधकाम कामगाराचे कोटक महिंद्रा बँक खाते उघडून देण्याच्या मोहिमेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच कामगारांना बीओसीडब्ल्यू स्मार्ट कार्ड प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेश पोळ म्हणाले, ” बांधकाम कामागारांची सुरक्षा हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे. बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना राबविणे, यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. बांधकाम व्यावसायिकांकडून घेतल्या जाणाऱ्या सेस करातील निधी यासाठी वापरला जातो. त्यामुळे या सेस कराचे वेळोवेळी सोशल ऑडिट होईल, तसेच या निधीच्या माध्यमातून बांधकाम कामगारांठी सुविधा उपलब्ध केल्या जाव्यात, यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा.”
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे म्हणाले, ” बरेचदा एखादी बिल्डिंग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. मात्र तिच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. असे न करता, सुरक्षेच्या उपाययोजनांना देखील नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे. त्याचबरोबर रस्ता सुरक्षा या विषयात चालकांचे प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्याकडे चालक प्रशिक्षण या विषयावर पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही. मात्र क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे रस्ता सुरक्षा या विषयावर राबविले जाणारे उपक्रम कौतुकास्पद आहे.”
अतुल चोरडिया म्हणाले, “ कामगार सुरक्षा हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा असून, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. याचाच परिणाम म्हणून कंपनीने गेल्या ५ वर्षांत केलेल्या तब्बल ५० ते ६० लाख स्क्वेअरफुट क्षेत्रफळावरील बांधकाम प्रकल्पात सुदैवाने एकही अपघात झालेला नाही. त्यामुळे सुरक्षा नियमांचे योग्यप्रकारे पालन हे सर्वात महत्वाचे आहे.’’
पराग पाटील म्हणाले, ” बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, कामगारांची सुरक्षा आणि चांगले राहणीमान या अनुषंगाने बांधकाम प्रकल्पांवर चांगले उपक्रम राबविले जावे यासाठी क्रेडाई पुणे मेट्रो’च्या कामगार कल्याण समितीतर्फे सातत्याने कार्यरत असते. कामगारांनी या योजनांचा लाभ घ्यावा.”
अश्विन त्रिमल यांनी यावेळी बांधकाम कामगारांना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
या सुरक्षा सप्ताहअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील डुडुळगाव येथील यशदा सुप्रीम याठिकाणी सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ५०० हून अधिक बांधकाम कामगार सहभागी झाले होते. यावेळी बांधकाम कामगारांचे एअरटेल पेमेंट बँक खाते उघडून देण्याच्या मोहिमेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ३० कामगारांचे बँक खाते उघडण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक साळुंखे, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे, विनोद चांदवानी, महासंचालक डॉ. डी के अभ्यंकर, कामगार कल्याण समितीचे सहसंयोजक पराग पाटील, कामगार अधिकारी समीर पारखी, सदस्य रोहित देशपांडे, यशदा रियल्टी ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक वसंत काटे, व्यवस्थापकीय संचालक सूर्यकांत जाधव व विजय काटे, एअरटेल पेमेंट्स बँकच्या विक्री विभागाचे उपाध्यक्ष भरतराज कडलग हे उपस्थित होते. यावेळी रणजित नाईकनवरे यांनी सुरक्षा सप्ताहाचे महत्व अधोरेखित करण्याबरोबरच बांधकाम कामगारांना बीओसीडब्ल्यू नोंदणी करण्याबाबत आवाहन केले. तर दीपक साळुंखे यांनी कामगारांना स्वत:च्या सुरक्षेबाबत दक्ष राहण्याचा सल्ला दिला. विनोद चांदवानी यांनी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. बांधकाम कामगार हे इमारती घडवत राष्ट्रनिर्मितीमध्ये मोठे योगदान देत असल्याचे आणि त्यामुळेच त्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाचे आहे असे वसंत काटे यांनी सांगितले. कार्यक्रमात काटे यांनी आभारप्रदर्शन केले. याव्यतिरिक्त शहरात अन्य बांधकाम प्रकल्पांवर देखील राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.