३२ वी पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धा – बीपीसीएल,आयओसी-ए, ओएनजीसी – ए आणि ओएनजीसी -बी हे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र
पुणे : ३२ व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेच्या (PSPB Inter Unit Chess Tournament) उपांत्य फेरीसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल),इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) -ए आणि ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) ए व बी हे चार संघ पात्र ठरले आहेत.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल)च्या वतीने पीवायसी हिंदू जिमखाना येथे आयोजित ३२ व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सांघिक सामान्यांच्या प्राथमिक स्तरावरील उर्वरित चार फेऱ्या पार पडल्या. याप्रसंगी मुख्य आयकर आयुक्त डॉ. दीपक रीपोते, माजी सनदी अधिकारी व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष भारत सासणे हे उपस्थित होते.
स्पर्धेत प्राथमिक स्तराच्या ७ व्या फेरीअखेरीस पूल – ए मध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी)- ए १३ गुणांसह प्रथम क्रमांकावर तर ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी)- बी संघ ११ गुणांसह द्वितीय क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पूल-बी मध्ये ओएनजीसी-ए संघ १४ गुणांसह स्पर्धेत आघाडीवर आहे. तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) संघ १२ गुणांसह २ ऱ्या क्रमांकावर आहे.
स्पर्धेत शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत आयओसी- ए आणि संघ बीपीसीएल संघ यांच्यात तसेच ओएनजीसी ए आणि बी या संघात अंतिम फेरीसाठी लढत होईल.
स्पर्धेत पूल १ मध्ये आज झालेल्या महत्वपूर्ण लढतीमध्ये सुरुवातीला ओएनजीसी-बी या संघाने आयओसी – बी संघावर २.५- १.५ गुणांनी मात केली. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर व्ही एस राहुल याने आंतरराष्ट्रीय मास्टर ईशा करवदे हिच्यावर मात केली. त्यानंतर आयओसी-बी च्या ग्रँडमास्टर ललित बाबू यांनी त्यांच्या संघाला बरोबरी साधून दिली. आंतरराष्ट्रीय मास्टर पी कोंज्युवेल आणि आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्य स्वामीनाथन यांच्यात बरोबरीचा सामना झाला. स्पर्धेत ओएनजीसी बी संघाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर ईशा शर्मा यांनी आयओसी-बी संघाच्या आंतरराष्ट्रीय मास्टर पद्मिनी राऊत यांच्या मात करत उपांत्य फेरीत आपल्या संघाला स्थान मिळवून दिले.