fbpx

आमदार करंडक फुटबॉल – संगम यंग बॉईजने पटकावले विजेतेपद 

पुणे – अत्यंत चुरशीने झालेल्या सामन्यात संगम यंग बॉईजने आपले कट्टर प्रतिस्पर्धी केपी इलेव्हनचा सडन डेथमध्ये ५-४ असा पराभव करून आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.  (MLA Cup Football )
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या माध्यमातून माया सेवा संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना निराशाजनक झाला. शासकीय पॉलिटेक्निकच्या मैदानावर हा सामना नियोजित वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिला. सामन्याच्या पूर्ण ७० मिनिटांच्या खेळात प्रतिस्पर्धी संघांना गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडता आली नाही.
नियोजित वेळेनंतर घेण्यात आलेला टायब्रेकरही ४-४ असा बरोबरीत राहिला. संगमकडून प्रतिक साबळे, नरसिंहा मगम, फिलिप देसा, हर्ष रेडेकर यांनी आपले लक्ष्य अचूक साधले. केपी संघाकडून विकी परदेशी, बेवन चौरप्पा, अल्फ्रेड नेगल, अभिषेक परदेशी यांनी गोलजाळीचा वेध घेतला. त्यानंतर सडन-डेथमध्ये संगमच्या फ्रॅंकी आणि केपीच्या रोमारियो नाझरेथ यांचे प्रयत्न् चुकले. दुसऱ्या प्रयत्नात केपीचा निर्मल छेत्री गोल करण्यात अपयशी ठरला. संगमसाठी मात्र यासिन खानने अचूक लक्ष्य साधत संघाला विजयी केली.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात दुर्गा एफए संघाने लौकिक एफए संघाला १-० असे हरवले. एकमात्र विजयी गोल मयूर वाघिरेने केला.
निकाल –
संगम यंग बॉईज ०, ५ (प्रिक साबळे, नरसिंह मगम, फिलिप देसा, हर्ष रेडेकर, यासिर खान) वि.वि. केपी इलेव्हन ०,४ (विकी परदेशी, बेवन चौरप्पा, अल्फ्रेड नेगल, अभिषेक परदेशी)
तिसऱ्या क्रमांकासाठी –
दुर्गा एसए १ (मयूर वाघिरे ३३वे मिनिट) वि.वि. लौकिक एफए ०
उपांत्य फेरी –
संगम यंग बॉईज १ (व्हॅलेंटाईन जोसेफ १३वे मिनिट) वि.वि. लौकिक एफए ०
केपी इलेव्हन २ (अल्फ्रेड नेगल ९वे मिनिट, ६४वे मिनिट) वि.वि. दुर्गा एस.ए. १ (नेल्सन पेस्ट १४वे मिनिट)

Leave a Reply

%d bloggers like this: