बुधवार पेठेतील देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला व ट्रान्सजेंडर समुदायासाठी ‘धारा मेळा’ संपन्न
पुणे : बुधवार पेठेतील देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला व ट्रान्सजेंडर समुदायासाठी पर्णकुटी संस्थेच्या वतीने ‘धारा मेळा’ या नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार पेठेत आयोजित या कार्यक्रमाला पर्णकुटी संस्थेच्या सहसंस्थापिका स्नेहा भारती, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे प्रकाश यादव, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे अभिजित लोंढे व सहकारी, स्वस्ति संस्थेचे गिरीजा ठाकूर व शिवाजी मोरे, मंथन संस्थेच्या आशा भट्ट, कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालयाच्या मृदुला जक्कल, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रियांका रायरकर, दीपक बनकर, उदयकाळ फाउंडेशनचे निलेश बागुल, प्रेरणा वाघेला, शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह फाऊंडेशनचे सुरेश उमप, तसेच बुधवार पेठ परिसरामध्ये काम करणाऱ्या संस्था व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
बुधवार पेठ परिसरामध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला व त्यांची मुले, एच.आय.व्ही. संसर्गित व बाधित, तसेच ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी संस्थेच्या ‘धारा’ प्रकल्पांतर्गत आयोजित कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जीवनावश्यक पौष्टिक आहार किटचे वाटप करण्यात आले. दरम्यान, या महिला व ट्रान्सजेंडर व्यक्तींनी बनविलेल्या कुकीज, चॉकलेट व डोनट, कापडी पिशव्या, चहा मसाले, हर्बल साबण, पेपर पिशव्या अशी विविध उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.
निलेश बागुल यांनी आपल्या उत्पादनाची मार्केटिंग कशी करावी, जाहिरात कशी करावी यासंबंधी मार्गदर्शन केले. प्रेरणा वाघेला यांनी व्यवसाय करताना व्यावसायिक दृष्टिकोन कसा असावा, याबाबत मार्गदर्शन केले. तर सुरेश उमप यांनी सकारात्मक दृष्टिकोनाचे वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील महत्त्व सांगितले.
स्नेहा भारती यांनी सांगितले, की पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरामध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला व त्यांची मुले, एच.आय.व्ही. संसर्गित व बाधित व्यक्ती, तसेच ट्रान्सजेंडर व्यक्ती व समाजातील इतर वंचित समुदायासाठी पर्णकुटी संस्था कार्यरत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम लोंढे यांनी, तर पर्णकुटी संस्थेच्या सह संस्थापिका स्नेहा भारती आणि कार्यक्रम समन्वयिका प्रभावती मुळे यांनी आभार मानले.