भीमथडी घोड्यांना राष्ट्रीय मानांकन मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील अश्वप्रेमींकडून विशेष प्रयत्न
तळेगाव दाभाडे येथे झालेल्या ७व्या मारवाडी हॉर्स शो’मध्ये या भीमथडी घोड्यांचे सादरीकरण
पुणे : एकेकाळी मराठा साम्राज्याच्या घोडदळात मानाचे स्थान असणाऱ्या भीमथडी घोड्यांच्या प्रजातीची आज दुरावस्था झाली आहे. या प्रजातीचे संवर्धन करण्याच्या हेतूने पुण्यातील अश्वप्रेमी रणजित पवार, सचिन जगताप आणि केशव जोशी यांनी राज्यातील इतर अश्वप्रेमींच्या सहकार्याने विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. याअंतर्गत राज्यातील तब्बल १००० भीमथडी घोड्यांच्या डीएनए तपासणीसाठी रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले असून, या घोड्यांना एक स्वतंत्र प्रजाती म्हणून राष्ट्रीय मानांकन प्राप्त व्हावे, यासाठी केंद्राकडे अर्ज सादर करण्यात आला आहे.
मराठा साम्राज्याच्या काळात भीमथडी घोड्यांच्या युद्धातील सहभागाच्या नोंदी अनेक ठिकाणी आढळते. मात्र नंतरच्या काळात झालेल्या दुर्लक्षामुळे घोड्यांच्या या प्रजातीची दुरावस्था झाली आहे. भीमथडी घोड्यांना त्यांचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी अश्वप्रेमी रणजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील काही अश्वप्रेमींनी एकत्र येत या भीमथडी घोड्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहे. नुकतेच इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे तळेगाव दाभाडे येथील जापालूप इक्वेस्ट्रियन सेंटर येथे आयोजित ७ व्या मारवाडी हॉर्स शो’मध्ये या भीमथडी घोड्यांचे सादरीकरण करण्यात आले होते.
सदर मारवाडी हॉर्स शो दरम्यान भीमथडी घोड्यांच्या संवर्धनाबाबत माहिती देताना रणजित पवार म्हणाले, “ भीमथडी घोड्यांच्या संवर्धनासाठी आम्ही बारामती येथील अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही अश्वप्रेमीनी राज्यात विविध ठिकाणी जाऊन सुमारे १००० घोड्यांच्या डीएनए तपासणीसाठी रक्ताचे नमुने गोळा केले आहेत. त्यांचा एक माहितीकोश तयार केला आहे. या प्रजातीला एका स्वतंत्र दर्जा मिळावा, यासाठी राजस्थानमधील बिकानेर येथील नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्स (एनआरसीई) या संस्थेच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारकडे याबाबत अर्ज दाखल केला आहे. ही मानांकन प्रक्रिया साधारणपणे सहा महिन्यात पूर्ण होईल, अशी आमची अपेक्षा आहे.”
केशव जोशी म्हणाले, “ भीमथडी घोड्यांना राष्ट्रीय मानांकन मिळाल्यानंतर त्यांना घोड्यांची एक स्वतंत्र प्रजाती म्हणून ओळख मिळेल. या घोड्यांच्या संवर्धनासाठी शासकीय मदत मिळण्यास हे मानांकन उपयुक्त ठरेल. भविष्यात या घोड्यांचे संवर्धन करून पोलो, एन्ड्युरन्स यांसारख्या क्रीडा क्षेत्रात त्यांचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
