पक्ष व चिन्ह चोरीला गेले तरीही उद्धव ठाकरे वाघच – अरविंद केजरीवाल
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्ष व चिन्ह चोरीला गेले आहे. पण उद्धव ठाकरे यांचे वडिल वाघ होते व उद्धव हे वाघाचे पुत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र आज त्यांच्यासोबत आहे. येत्या सर्व निवडणुका उद्धव ठाकरेच जिंकतील, असा विश्वास आम आदमी पार्टीचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल {Arvind Kejriwal) यांनी व्यक्त केला. इडी (ED) आणि सीबीआयचा (CBI) वापर हे भेकड लोक करतात. पण आम्हाला फरक पडत नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो असेही केजरीवाल म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Man) हे मुंबई दौ-यावर आले असून या दरम्यान या दोघांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेला तिघांनी संबोधित केले. आपल्या देशाला मजबूत करण्याची आमची विचारधारा असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. अरविंद केजरीवाल म्हणाले, मागच्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांचा पक्ष व चिन्ह चोरीला गेले. त्यांचे सर्वस्व चोरीला गेले. पण संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना न्याय मिळेल. येत्या सर्व निवडणूका ते जिंकतील असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. मात्र येत्या निवडणुकांत उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार किंवा नाही याबाबत मात्र अरविंद केजरीवाल यांनी मौन बाळगले.
