Pune – मनसे ‘शून्यावर’ आणण्याचा राज ठाकरे यांचीच ‘ईच्छा ‘?
कसब्यात भाजपला पाठिंब्याच्या भूमिकेमुळे मतदार आणि कार्यकर्ते देखील नाराज
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सतत भुमिका बदलण्याच्या स्वभावामुळे ‘ मनसे ‘ची वाताहत झाली आहे. नुकतेच कसबा निवडणुकीच्या निमित्ताने बदलत्या भूमिकेमुळे यावर शिक्कामोर्तब झाले असून आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या ‘ शून्यावर ‘ येईल, अशी चर्चा मनसे कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मनसेचे फायरब्रॅंड वसंत मोरे यांच्या विरोधकांना कात्रज मध्ये ताकत देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांच्या आदेशावरून कसब्यात समर्थन देण्यामुळे मनसे मध्ये आणखी मोठी फूट पडणे अटळ असल्याचे बोलले जात आहे.
कसबा निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी मनसेचे नेते दीपक पायगुडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. साधारण त्याच सुमारास मनसेचे सरचिटणीस बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या आदेशावरून कसब्यात भाजपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला. मतदानाला अवघे काही तास बाकी असताना राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे खरा सर्वाधिक झटका बसला तो मनसे कार्यकर्त्यांना आणि महापालिका निवडणूक इच्छुकांना.
याची पार्श्वभूमी अशी की पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. काही दिवसानंतर भाजपला प्रचारात उतरणार नाही या अटीवर पाठिंबा जाहीर केला. परंतु यानंतरही मनसेचे कार्यकर्ते जुना सहकारी असलेल्या महाविकास आघाडी चे उमेदवार आणि त्यांच्या स्थानिक अडचणीत मित्र म्हणून कायम पाठीशी राहणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभाग घेतला. यामुळे मनसेने कसब्यातील 7 जणांचे निलंबन केल्यानंतर 50 कार्यकर्त्यांनी पक्षालाच रामराम ठोकला.
मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कसब्यात भाजपच्या प्रचारात सक्रिय होण्याचे आदेश दिले. ते देखील मनसेत असले तरी गेली 15 वर्षे निष्क्रिय असलेल्या दीपक पायगुडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर. विशेष असे की त्याच शिंदे यांनी चार दिवस अगोदर मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांच्या बालेकिल्ल्यात मोरे यांच्या विरोधकांची मोट बांधली आहे. यामुळे राज ठाकरे हे स्वतःच पक्ष आणि कार्यकर्त्यांची राजकीय ईच्छा आकांक्षा धुळीस मिळवत असल्याचा मेसेज गेला आहे.
पक्ष स्थापनेनंतर अगदी सुरवातीचे काही वर्षे सक्रिय राहिलेले दीपक पायगुडे हे त्यांच्या लोकसेवा बँकेतील घोटाळ्यानंतर राजकारणातून बाजूला झाले. या काळात पक्षाच्या नवरसेवकांची संख्या 8 वरून 29 पर्यंत वाढली. विशेष असे की भाजपच्याच बालेकिल्ल्यात हे यश मिळाले. परंतु केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मात्र तीच मनसे 29 वरून अवघ्या 2 नगरसेवकांवर आली. यामध्ये मुस्लिम बहुल भागातून विजयी झालेले साईनाथ बाबर आणि विकास कामातून लोकप्रिय झालेले कात्रज मधील नगरसेवक वसंत मोरे यांचा समावेश आहे. विशेष असे की मोरे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने त्यांच्या मूळ प्रभागाचे तीन तुकडे केले. पण वसंत मोरे यांच्या जनमानसातील प्रतिमेने त्याना विजयी केले.
अशा परिस्थितीत राज ठाकरे यांची कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील भुमिका ‘ बेगानी शादी में अब्दुला दिवाना ‘ अशीच असून कार्यकर्त्यांचे ‘ मॉरल’ डाऊन करणारी असल्याचे पडसाद मनसेत उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या अशा रंग बदलत्या भूमिकेमुळे मतदारांमध्ये मोठी नाराजी पसरत असून आगामी महापालिका निवडणुकी पर्यंत मनसेत आणखी पडझड तर होईल, अशी भीती मनसैनिक करू लागले आहेत.
