Wednesday, May 27, 2026
Latest NewsSports

पेट्रोलियम क्रीडा मंडळ- मणिपूर अंतिम लढत


८४ वी योनेक्स सनराईज वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : ८४ व्या योनेक्स सनराईज वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा स्पर्धेत बलाढ्य पेट्रोलियम क्रीडा मंडळाने अपेक्षित कामगिरी करताना अंतिम फेरीत धडक मारली. विजेतेपदासाठी आता त्यांच्यासमोर डार्क हॉर्स ठरलेल्या मणिपूरचे आव्हान असेल.

पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने ८४ वी योनेक्स सनराईज वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु आहे. यजमान महाराष्ट्राचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. महाराष्ट्राला कर्नाटकाने पराभूत केले.

मात्र, स्पर्धेत सर्वात सनसनाटी कामगिरी मणिपूरने केली. त्यांनी प्रथमच हरियानाचा प्रतिकार ३-२ असा मोडून काढला. त्यानंतर उपांत्य फेरीत मणिपूरने गतविजेत्या एअरपोर्ट अॅथॉरिटी संघाचे आव्हान ३-१ असे संपुष्टात आणले. दुसऱ्या उपांत्य लढतीत पेट्रोलियम क्रीडा मंडळाने कर्नाटकाचा प्रतिकारक ३-२ असा मोडून काढला.

दुहेरीतील यशाबरोबर महिला एकेरीत माहेश्वरी देवी क्षेत्रिमायुमने मिळविलेले विजय मणिपूरसाठी महत्वाचे ठरले. झपाट्याने प्रगती करणाऱ्या मणिपूरने उपांत्य पेरीत पहिलीच मिश्र दुहेरीची लढत सहज जिंकली. डिंगकू सिंग कोंथौजाम-प्रिया देवी कोंजेंगबाम जोडीने एअरपोर्ट अॅथॉरिटीच्या कृष्णा प्रताप गर्ग-उन्नती बिश्त जोडीचे आव्हान २१-१०, २१-१३ असे अवघ्या २४ मिनिटांत संपुष्टात आणले. त्यानंतर मात्र किरण जॉर्जने मैस्नाम मेईराबाचा २१-१४, २१-१६ असा पराभव करून एअरपोर्ट संघाला बरोबरी मिळवून दिली.

मात्र, या बरोबरीचा फायदा त्यांना उठवता आला नाही. उदयोन्मुख माहेश्वरीने कमालीच्या संयमाने खेळ करताना पहिली गेम गमाविल्यानंतरही उन्नती बिश्तच्या अनुभवाला १५-२१, २१-१९, २१-११ असा शह दिला आणि मणिपूरला पुन्हा २-१ अशा आघाडीवर नेले. त्यानंतर मनजित सिंग ख्वायराक्पाम-डिंगकु कोंथौजाम जोडीने पुरुष दुहेरीच्या लढतीत एअरपोर्ट अॅथॉरिटी संघाचा श्रीश बिश्त-कार्तिकेय गुलशन कुमार जोडीवर २८ मिनिटात २१-१३, २१-१५ असा विजय मिळवून मणिपूरला विजयी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अखेरची महिला दुहेरीची लढत खेळविली गेली नाही.

पेट्रोलियम क्रीडा मंडळाने कर्नाटकचा कडवा प्रतिकार सहन करत अंतिम फेरी गाठली. पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय या अनुभवी खेळाडूचा पराभव खरे तर पेट्रोलियम संघाला बसलेला धक्का होता. मात्र, महिला एकेरीत अस्मिता चालिहा, मिश्र दुहेरीत चिराग शेट्टी-अश्विनी पोनप्पा, महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी या अनुभवी खेळाडूंनी पेट्रोलियम संघाचा विजय साकारला.

प्रथम मिश्र दुहेरीत चिराग-अश्विनीने कर्नाटकाच्या साई प्रतिक-अश्विन भटचा २१-९, १९-२१, २१-१८ असा पराभव केला. त्यानंतर सनीथने प्रणॉयवर २१-१५, २१-६ असा विजय मिळवून सनसनाटी निर्माण केली. पण, महिला एकेरीत अस्मिताने तान्या हेमंथचा २१-१५, २३-२१ असा पराभव करून पेट्रोलियमला पुन्हा आघाडीवर नेले. पुरुष दुहेरीत पुन्हा एकदा कर्नाटकने बाजी मारून लढतीत रंगत आणली. नितीन एच. व्ही-साई प्रतिकने मनु अत्री-आदित्य जोशीचा २१-१४, २१-१७ असा पराभव केला.

निर्णायक महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डीचा सामना कर्नाटकाच्या शिखा गौतम-अश्विनी भटला करता आला नाही. सिक्की-अश्विनीने लढत २१-१६, २१-१६ अशी सहज जिंकताना पेट्रोलियम संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading