Thursday, September 24, 2026
Latest NewsPUNE

पुष्पौषधी उपचार पद्धती कलेचा भाग : डॉ. अविनाश भोंडवे

पुणे : असाध्य आजारांवर आधुनिक वैद्यक शास्त्राद्वारे काही उपाय करणे शक्य नसल्यास पर्यायी औषध प्रणालीचा वापर केला जातो. पर्यायी औषध पद्धती म्हणून पुष्पौषधीचे कौतुक वाटते. कारण या पद्धतीमध्ये रुग्णाला तपासले जात नाही तर त्याच्या स्वभावाच्या प्रकारानुसार औषध योजना केली जाते. ही औषध योजना वापरणे कला आणि कौशल्याचा भाग आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य लिखित पुष्पौषधी या पुस्तकाच्या इंग्रजीत अनुवादित बॅच फ्लावर रेमेडिज्‌‍चे लोकार्पण डॉ. भोंडवे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद बॅच फाउंडेशन रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर स्वामिनी पंडित यांनी केला आहे. नंदिनी पब्लिशिंग हाऊसचे संतोष तांबोळी, युवराज शहा उपस्थित होते.

डॉक्टरांनी मिक्सोपॅथी करू नये असा सल्ला देऊन डॉ. भोंडवे म्हणाले, शरीराच्या क्रियात्मक दोषांना बरे करण्यासाठी पर्यायी औषध प्रणाली उपयुक्त ठरू शकते परंतु रचनात्मक दोष दूर करण्यासाठी आधुनिक वैद्यक शास्त्राचा वापर करणे योग्य ठरते. निसर्ग, मानसशास्त्र आणि औषधशास्त्र या गोष्टींचा त्रिवेणी संगम पुष्पौषधींमध्ये आढळतो. कुठलेही वैद्यकीय शास्त्र ज्ञानातून आणि अनुभवातून विकसित केले जाते. त्यामुळे पर्यायी वैद्यकीय शास्त्राचा उपयोग घेताना योग्य ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडून उपचार करून घ्यावेत. रुग्णांना बरे वाटावे हा प्रत्येक औषध शास्त्राचा उद्देश असतो. एका ठराविक उपचार पद्धतीने रुग्ण बरा होतो हा अट्टाहास बाजूला ठेऊन पर्यायी औषध पद्धतीचा वापर करण्यास हरकत नाही.

पुष्पौषधी उपचार पद्धतीविषयी बोलताना डॉ. माधवी वैद्य म्हणल्या, पूर्ण विकसित फुलांपासून तयार केलेल्या पुष्पौषधी मनातील नकारात्मक विचार व स्वभावदोषांवर परिणामकारक ठरतात. या औषधी कालबाह्य होत नाहीत तसेच त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या औषधी माणसांप्रमाणेच वनस्पती व प्राण्यांवरही परिणामकारक ठरतात. अशा या बहुगुणी पुष्पौषधी उपचार पद्धतीला कोणतेही पथ्य नाही. आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक वयोगटातील व्यक्ती अनेक ताणतणांवाना सातत्याने सामोरे जात असताना या उपचार पद्धतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. बहुभाषिक लोकांपर्यंत पुष्पौषधीची माहिती पोहोचावी या उद्देशाने मराठीतील पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करण्यात आला आहे.
स्वामिनी पंडित, युवराज शहा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक गार्गी तांबोळी यांनी केले. परिचय आणि सूत्रसंचालन बीना जोशी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading