Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

नाटक आणि नृत्यात हावभाव हा समान दुवा : मनिषा साठे

पुणे : नाटक हे संहिता आणि संवादाचे माध्यम आहे. नृत्यात सूर-ताल तर नाटकात अंगिक आणि वाचिक अभिनय महत्वाचा असतो. नाटक आणि नृत्यातील समान दुवा असतो तो हावभाव, असे प्रतिपादन ज्येष्ठ कथक नृत्यगुरू मनिषा साठे यांनी केले.
एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. श्यामल कुलकर्णी स्मृती श्यामल करंडक राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ निळू फुले कला अकादमी येथे आयोजित करण्यात आला होतो. त्या वेळी साठे यांनी स्पर्धक महिलांशी संवाद साधला.
स्पर्धेत राज्यातील 36 महिला सहभागी झाल्या होत्या. श्यामल करंडक आणि पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक केतकी पांडे (10%) यांनी पटकाविले. तीन हजार रुपयांचे द्वितीय पारितोषक आणि स्मृतीचिन्ह अनघा बुरसे (गावरान पास्ता) यांना तर दोन हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह गंगा मेश्राम (वंचित) यांना मिळाले. विनिता दण्डारे (तुला शिकायचंय) आणि जान्हवी मोरे-पाटील (स्त्रीचक्र) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. अंतिम फेरीचे परीक्षण अंजली कऱ्हाडकर, मंजिरी धामणकर, अरूण पटवर्धन यांनी केले. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
पारितोषिक वितरण समारंभास सौ. श्यामल कुलकर्णी यांच्या कन्या अनुजा कोल्हटकर, एकपात्री कलाकार परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष दीपक रेगे, निळू फुला कला अकादमीचे विश्वस्त सुरेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. अंतिम स्पर्धेत अनघा बुरसे, नीलिमा पाठक, भावना प्रसादे, गंगा मेश्राम, भाग्यश्री वाळवेकर, विनिता दंडारे, प्रिया विरवे, केतकी पांडे, जान्हवी मोरे-पाटील, निशा शेलार, सारिका वाघमोडे यांनी सादरीकरण केले. महिला सबलीकरण, बालमजुरी, महिलांची ग्राहकता यासह विविध विषय घेऊन स्पर्धक महिलांनी सादरीकरण केले. परिक्षकांच्या वतीने मंजिरी धामणकर यांनी मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश अनुजा कोल्हटकर यांनी सांगितला. सूत्रसंचालन अनघा गपचुप यांनी केले तर सुरेश देशमुख यांनी आभार मानले. एकपात्री कलाकार परिषदेचे अध्यक्ष दीपक रेगे, सचिव भाग्यश्री देशपांडे, उपाध्यक्ष चैताली माजगावकर-भंडारी, मंजुषा जोशी, महेश टिळेकर, शांभवी बोधे, पल्लवी परब-भालेकर, प्रिया उंडे आदिंनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply