Tuesday, July 28, 2026
Latest NewsSports

मानसिक,शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी खेळाला महत्व – हेमंत टाकळकर

पुणे : मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी खेळाला महत्व असून प्रत्येकाने खेळ खेळला पाहिजे व नवीन पिढीतील मुला- मुलींना मैदानी खेळ खेळण्यास पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार प्राप्त खोखोपटू व प्रशिक्षक हेमंत टाकळकर यांनी केले.कर्वेनगर युथ फोरम द्वारा आयोजित खेलकुद २०२३ च्या क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी हेमंत टाकळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अतिशय उत्साहवर्धक आणि आनंददायी कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा कायम ठेवत ‘कर्वेनगर युथ फोरम’ तर्फे शिवजयंती निमित्त रविवारी १९ फेब्रुवारीला सकाळी ८ ते १२ या वेळेत कर्वेनगर येथील भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम शाळेच्या क्रीडा मैदानावर ‘खेलकूद २०२३’ हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

ह्या क्रीडा महोत्सवात लहान मुले,सर्व वयोगटातील महिला व पुरुष,नागरिक मिळून एकूण ७५ जणांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून मनमुराद आनंद लुटला.  या क्रीडा महोत्सवात अक्षरशः ४ वर्षापासून ते ५८ वर्षांपर्यंत सर्व नागरिकांनी,मुला – मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला हे विशेष. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य,आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होते.
आयोजकांनी क्रिकेट, बॅडमिंटन,फुटबॉल सारखे नेहमीचे खेळ सोडून जाणीवपूर्वक काही कालातीत झालेले खेळ आणि मोठ्यांना सुद्धा खेळता येतील पारंपरिक क्रीडा प्रकार असे काही खेळ ह्या क्रीडा महोत्सव मध्ये समाविष्ट केले होते. 

विशेष करून महिला वर्गाने सुद्धा रोजच्या कामांच्या व्यग्रतेतून वेळ काढून यानिमित्ताने उन्मुक्त होऊन विविध खेळांचा आनंद घेतला. लंगडी,लगोरी,बटाटा शर्यत, धावणे,डॉज-बॉल असे विविध क्रीडा प्रकार या वेळी घेण्यात आले. शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येक चमुला रायगड, शिवनेरी असे एकेका गडाचे नाव देण्यात आले होते. सर्व स्पर्धा संपल्यानन्तर सर्व स्पर्धकांना खेलकुद २०२३ सहभागी प्रमाणपत्रही प्रमुख पाहुणे अर्जुन पुरस्कारप्राप्त खोखोपटू व प्रशिक्षक हेमंत टाकळकर यांचे हस्ते देण्यात आले.
क्रीडा महोत्सवाची सुरुवात शिवप्रतिमा पूजन ने झाली.हलके व्यायाम आणि योगासने सर्वांकडून झाली.अर्जुन पुरस्कार विजेते खोखो पटू व प्रशिक्षक हेमंत टाकळकर यांची कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थिती ही एक पर्वणीच होती.
खेलकुद २०२३ ह्या क्रीडा महोत्सव यशस्वितेसाठी कर्वेनगर युथ फोरमचे सेजल गायकवाड,मंदार गर्दे,ईरा लागू,निखिल पाठक,प्रथमेश खंडकर,अनय अष्टपुत्रे, रुपाली लागू,वेधस रानडे आणि श्रद्धा खटावकर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading