Friday, September 25, 2026
ENTERTAINMENTLatest News

गणरायाच्या आशीर्वादाने नव्या मालिकेचा प्रवास सुरू

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू होणारी प्रत्येक नवी सुरुवात खास असते. याच भावनेतून झी मराठीने आपल्या आगामी ‘धाकट्या सुनबाई’ या नव्या मालिकेची नेहमीच्या पद्धतीने प्रेस मीट न करता, थेट गणरायाच्या चरणी शुभारंभ केला. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात, मुंबईचा राजा गणेश गल्ली समोर मालिकेची खास प्रेस मीट पार पडली. निर्माते महेश कोठारे, मालिकेतील कलाकार मंदार जाधव, चिन्मयी मोरे, मुग्धा कर्णिक यांच्यासह संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.

मालिकेत मंदार जाधव वेदांत पटवर्धन ही भूमिका साकारत असून, तो कुटुंबावर प्रेम करणारा, प्रत्येकाला साथ देणारा आणि अन्यायाविरोधात ठामपणे उभा राहणारा तरुण आहे. तर चिन्मयी मोरे राधिकाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. या मालिकेत दोन कुटुंबांची गोष्ट, त्यांचे विचार आणि नात्यांमधील गुंतागुंत पाहायला मिळणार आहे. आपल्या माणसांची साथ आणि नात्यांमधला विश्वास आयुष्याला कसा अर्थ देतो, याची गोष्ट राधिका आणि वेदांतच्या आयुष्यातून ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेत उलगडणार आहे.

आपल्या पहिल्या मालिकेबद्दल बोलताना चिन्मयी मोरे म्हणाली, “माझ्यासाठी हा प्रवास खूप खास आहे आणि या सगळ्याची सुरुवात मुंबईच्या राजाच्या चरणी होत आहे, यापेक्षा सुंदर आणखी काय असू शकतं! माझ्या पहिल्या मालिकेसाठी झी मराठीसारखं उत्तम व्यासपीठ, महेश कोठारे सरांचं कोठारे व्हिजन सारखं प्रोडक्शन हाऊस, खूप छान सहकलाकार आणि आजची ही प्रेस मीटसुद्धा इतक्या सुंदर आणि शुभ ठिकाणी होत आहे. सगळ्या गोष्टी अगदी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने जुळून आल्या आहेत. त्यामुळे मी खूप आनंदी आणि भारावलेली आहे. या सगळ्यासाठी मी बाप्पाचे मनापासून आभार मानते आणि ‘धाकट्या सुनबाई’ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळावं, अशी बाप्पाकडे प्रार्थना करते.”

मंदार जाधवनेही या खास प्रसंगाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले, “‘धाकट्या सुनबाई’च्या प्रेस मीटची सुरुवात मुंबईच्या राजाच्या आशीर्वादाने होत आहे, यासाठी मी खूप आनंदी आणि स्वतःला खूप भाग्यवान समजतो. गणेशोत्सवासारख्या मंगलमय आणि महत्त्वाच्या प्रसंगी, अशा शुभ ठिकाणी आपल्या मालिकेचा प्रेस लॉन्च होणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यासोबतच आज आम्हाला प्रेक्षकांनाही प्रत्यक्ष भेटता आलं आणि आमच्या नव्या मालिकेबद्दल त्यांना स्वतः सांगता आलं, हीसुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. बाप्पाचा आशीर्वाद या मालिकेला मिळाला आहे, अशी भावना मनात आहे. आता आम्ही २८ सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत आहोत.”

गणरायाच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा नवा प्रवास आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘धाकट्या सुनबाई’ २८ सप्टेंबरपासून संध्या. ६.३० वा.सदैव तुमच्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading