वादग्रस्त निर्णय देणारा केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करा – उद्धव ठाकरे
मुंबई : आमदारांच्या पात्रतेची याचिका कोर्टात प्रलंबीत असताना निवडणूक आयोगाला कशाची घाई होती? निवडणूक आयोगाचा निकाल अयोग्य आहे. सुप्रीम कोर्टची गुंतागुंत वाढविण्यासाठी आयोगाने घाई घाईत निर्णय घेतला असून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्यापासून सुनावणीला सुरुवात होईल, असे सांगत हा निर्णय देणारा निवडणूक आयोग बरखास्त करा, अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रतिनिधींची आज बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग आणि शिंदेगटावर त्यांनी जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, पक्ष चिन्ह आणि नावासाठी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होती. यासाठी आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला पदरमोड करून शपतपत्र सादर करण्यास सांगितली. मात्र निवडणूक आयोगाने निर्णय देताना प्रतिनिधीच्या संख्येवर निर्णय दिला आहे. मग आम्हाला हा खटाटोप करायला का सांगितला? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
तसेच सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या पात्रतेची याचिका दाखल असताना घाई घाईत निवडणूक आयोगाने निर्णय देणे अयोग्य आहे. न्यायालयाच्या निकालातील गुंतागुंत वाढविण्यासाठी हा निकाल देण्यात आला आहे, असा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच ज्या निवडणूक आयुक्तांनी हा निर्णय दिला. त्यातील एकाची भाजप कडून तातडीने नेमणूक केली गेली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग बरखास्त करून आयुक्तांची देखील निवडणुकीने नेमणूक व्हावी, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली आहे.
