Wednesday, October 28, 2026
Latest NewsPUNE

महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड व मुखवटा

पुणे : सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन साकारण्यात आलेली ही चक्केश्वराची पूजा लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात साकारण्यात आली. तब्बल १०१ किलो चक्का वापरून शंकराची पिंड व मुखवटा तयार करण्यात आला होता.

बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा आणि फळा-फुलांची आरास करण्यात आली. शिल्पकार सचिन जोशी यांनी साकारलेला शंकराचा मुखवटा विशेष आकर्षण ठरला.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उपउत्सवप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनील रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते.

शिल्पकार सचिन जोशी यांसह मंदिरातील सेवेकरी उमेश धर्माधिकारी, युवराज पवार, वैभव निलाखे, प्रभावती नांगरे, दैवशाली होनराव, शोभा गादेकर, कल्लाप्पा घेरडे यांनी चक्क्याची शंकराची पिंड आणि आरास तीन तासात साकारली. रमेश राजहंस गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी म्हणाले, महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी १०१ किलो चक्का वापरुन शंकराची पिंड साकारण्यात आली. भगवान शंकराचा केलेला मुखवटा हे विशेष आकर्षण होते.

कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, सुकामेवा, द्राक्षे, नारळ यांसह विविध प्रकारच्या फळे, फुलांचा वापर देखील करण्यात आला आहे. या चक्क्याचे श्रीखंड करुन हा प्रसाद मंदिरात येणा-या भाविकांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply