श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती मिरवणूक
१५०० विद्यार्थी करणार राज्यगीताचे समूहगान
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणातून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. यावेळी तब्बल १५०० विद्यार्थी पांरपारिक वेशात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे समूहगान करणार आहेत. अशी माहिती श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात यांनी दिली.
श्री शिवाजी मराठा सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू होईल. बाजीराव रस्त्यामार्गे चितळे बंधू मिठाईवाले – महात्मा फुले मंडई – शिवाजी रोड मार्गे पुन्हा श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये मिरवणूक संपेल.
राजमाता जिजाऊ आणि बाल शिवरायाची मूर्ती असलेला फुलांनी सजलेला रथ मिरवणुकीच्या अग्रभागी असेल. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचा नगारा, शिवगर्जना ढोल ताशा पथक आणि गंधर्व बँडचे वादन होणार आहे. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखांचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत. यावेळी पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत आदी संदेश विद्यार्थी मिरवणूकीत देणार आहेत.
