Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

अवघ्या तीन वर्षांची पुण्याची वेदांशी विदेशात गाते शिवरायांची स्तुती

पुणे : बालपणात चिऊ- काऊच्या, परिकथेच्या गोष्टी ऐकत आणि भातुकलीचा खेळ खेळत प्रत्येकजण मोठा होतो. पण याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणा-या वेदांशी भोसले हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला आहे. सर्वात लहान वयात पोवाडे गाण्याचा हा विक्रम तिच्या नावावर आहे. अवघ्या ३ वर्षांची ही चिमुकली परदेशात राहून मराठी मातीतील संस्कार न विसरता छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा खड्या आवाजात गाते.

वेदांशी ही मूळची पुण्यातील घोरपडे पेठेतील असून सध्या ती तिच्या आई-वडिलांबरोबर डेन्मार्क येथील ओडेन्स या शहरात रहात आहे. ओडेन्स येथे झालेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमात ३ मिनिटे आणि ५८ सेकंदात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्तुती पोवाडा तिने गायला आहे.

सर्वात लहान वयात (वय ३ वर्ष ५ महिने १९ दिवस) पोवाडा गाणारी मुलगी म्हणून इंडिया बुकने तिची नोंद घेतली आहे. आई प्रीती भोसले हि गृहिणी आहे आणि वडील संतोष भोसले हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. वेदांशी ही २ वर्षांची असल्यापासून मराठी कविता, श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हणते.

संतोष भोसले म्हणाले, परदेशात वडीलधा-या मंडळींच्या अनुपस्थितीत तिला आपले भारतीय संस्कार कसे देता येतील, याचा सतत प्रयत्न आम्ही करीत असतो.

प्रीती भोसले म्हणाल्या, मी वेदांशीला दररोज मराठी भक्ती गीते, भावगीते, श्लोक, गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि कथा ऐकवत असे आणि तितकेच मन लावून वेदांशी या सगळ्या गोष्टी ऐकायची आणि त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करायची. या गोष्टीचा परिणाम तिचे वय वाढत असताना खूप छान झाला आणि त्यामुळेच ती सगळे श्लोक, भावगीते व पोवडा आनंदाने म्हणते, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading