विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात केंद्रीय अर्थसंकल्प प्रदर्शन
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात दरवर्षीप्रमाणे केंद्रीय अर्थसंकल्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत विद्यापीठातील सर्व विद्यार्थी व सर्व नागरिकांसाठी खुले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. संजीव सोनावणे यांच्या हस्ते झाले. लोकांमध्ये अर्थसंकल्पाविषयी जागरुकता निर्माण करणे व विभागातील विद्यार्थ्यांमध्ये अर्थसंकल्पाच्या विविध बाबी इतरांना समजावून सांगणे व तशी कौशल्ये विकसित करणे अशा दुहेरी हेतूने दरवर्षी असे प्रदर्शन अर्थशास्त्र विभागात आयोजित केले जाते. पुणे व परिसरातील महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली व त्यांचे अभिप्राय नोंदविले. गेली दोन वर्षे असलेले करोनाचे सावट नसल्यामुळे विभागातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अभूतपूर्व होता. विभागप्रमुख प्रा.डॉ.विलास आढाव यांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व या उपक्रमाला सहाय्य केले. डॉ. मानसी गोरे यांनी या प्रदर्शनासाठी समन्वयक म्हणून काम केले.
