प्रत्येक भेटीतून नातं उलगडण्याचा आनंद घ्या : चारूदत्त आफळे
पुणे : ‘‘आजकाल शेजारच्या खोलीत बसलेल्या माणसाशी बोलायला देखील फोन वापरला जातो. परंतु मुळात फोन, व्हॉटस्अप हे आपल्यापासून लांब असणाऱ्यांशी संवाद साधण्याचे साधन, यंत्र आहे, हे समजून घ्यायला हवे. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्यक्ष भेटीचा आनंद घेतला पाहिजे. प्रत्यक्ष भेटीतून एकमेकांशी बोलणे, संवाद साधणे, आदरभाव व्यक्त करणे यातून आपलं नातं अधिक उलगडत जाणार आहे,’’ असे मत ज्येष्ठ कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी व्यक्त केले.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने बारा शाळा व संस्कार वर्गामधील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी तिळगूळ राजा, तिळगूळ राणी’ या अभिनव स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आफळे आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी आफळे बोलत होते.
आफळे म्हणाले,‘‘मुलांनी चांगले मराठी वाचले, तर आपली संस्कृती पुढे जाईल. तसेच जिभेला झालेली जखम लवकर बरी होते, तर जिभेने झालेली जखम लवकर बरी होत नाही, हे लक्षात घ्यायला हवे.’’ संस्कारांना स्पर्धात्मक रूप देत संस्कृतीबाबत जागरूकता निर्माण करण्याचे चांगले काम ट्रस्टतर्फे होत असल्याचे कौतुकोद्गारही त्यांनी काढले. डॉ. मोरे म्हणाले,‘‘वर्षाच्या शेवटी आपण एकमेकांची क्षमा मागितली पाहिजे. राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांनी तर हमखास क्षमा मागायला हवी. एकमेकांशी जवळीक वाढविणाऱ्या या गोष्टी असून सणावारांच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे.’’
‘सर्वोत्कृष्ट संस्कृती संवर्धक शाळा’ स्पर्धेत डीईएस पूर्व प्राथमिक शाळेला पहिला क्रमांक (अडीच हजार रुपये) मिळाला. तर एनईएमएस शनिवार पेठ आणि नूमवि शाळा यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच नवीन मराठी शाळा, सेंट हिल्डाज शाळा, सरगम अभिरुची वर्ग, आबासाहेब अत्रे, भावे प्राथमिक शाळा यांचा उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांकडून तिळगूळ राजा’ म्हणून समर जोशी आणि तिळगूळ राणी’ म्हणून अमृता खवळे यांना गौरविण्यात आले. नातेसंबंधातला आणि आपले सर्वच सणसूद मधील गोडवा पुन्हा एकदा वृद्धिंगत व्हावा ह्या हेतूने हा अभिनव उपक्रम चे आयोजन केले असे पियुष शाह ह्यांनी सांगितले
कार्यक्रमाचे व स्पर्धेचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष पियुष शाह यांनी केले होते. कार्यक्रमाच्या नियोजनात विश्वास भोर, कुमार अनवेकर, नरेंद्र व्यास, सचिन पवार, गणेश चव्हाण, अमित विसखंडे, गंधाली शाह, समीक्षा सोनवणे, सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतिन पांडे यांनी केले.
